राष्ट्रपतींसंबंधीच्या निकालावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी साधला निशाणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपतींना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीवरील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी यावर आक्षेप व्यक्त केला आहे. देशातील यादवी युद्धासाठी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत. धार्मिक युद्ध भडकवण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार असून ते आपली मर्यादा ओलांडत असल्याचेही खासदार दुबे पुढे म्हणाले. या विधानानंतर लगेचच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी दुबे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. अशा परिस्थितीत सरन्यायाधीशच कोणत्याही नियुक्ती प्राधिकरणाला सूचना कशा देऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित करतानाच संसद या देशाचे कायदे बनवते, तुम्ही त्या संसदेला सूचना द्याल का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. न्यायालय आपल्या मर्यादेपलीकडे जात आहे. जर सर्वांना सर्व बाबींसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत असेल तर संसद आणि विधानसभा बंद केल्या पाहिजेत, असेही दुबे म्हणाले. भाजप खासदारांनी सर्वोच्च न्यायालयावर धार्मिक वादांना प्रोत्साहन देण्याचा आरोपही केला. कलम 377 चा हवाला देत दुबे म्हणाले, ‘एक काळ असा होता जेव्हा समलैंगिकता गुन्हा मानली जात असे. प्रत्येक धर्म ते चुकीचे मानतो. पण एका निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रपतींच्या विधेयकावरील निर्णयाबाबतचे प्रकरण तामिळनाडूचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वादातून उद्भवले. सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल रोजी राज्यांकडून पाठविण्यात आलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींना 3 महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा लागेल, असा निकाल दिला होता. यासंबंधीचा आदेश 11 एप्रिल रोजी निघाला होता.
दुबे यांचे विधान बदनामीकारक : काँग्रेस
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यामुळे सरकार आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्ष आणखीनच वाढला आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने दुबे यांच्या विधानाला बदनामीकारक म्हटले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भाजप जाणीवपूर्वक संवैधानिक संस्थांवर हल्ला करत आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करणे, ईडीचा गैरवापर आणि धार्मिक ध्रुवीकरण या मुद्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी केला.