सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, 10 ग्रॅम सोन्याचा दर आता किती झाला?
Marathi April 21, 2025 01:25 PM

सोन्याचे किंमत क्रॉस 1 लाख चिन्ह: अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळ जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच चीन (China) आणि अमेरिका (America) यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लावण्याचा सपाटा सुरु आहे. या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असणाऱ्या सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ झाली आहे. सोमवारी वायदे बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली. एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी 99,500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये वस्तू व सेवा कराच्या (GST Tax) रक्कमेचा समावेश केल्यास आता ग्राहकांना एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता सोने खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेल्याचे दिसत आहे.

जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहे. अमेरिका आणि चायना यांच्यातील ट्रेड वॉरचा (Tarrif War) परिणाम म्हणून गुंतवणूक दार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर आज 96200 तर जी एस टी सह हेच 99200 वर जाऊन पोहोचले आहेत. लवकरच सोन्याचा दर जीएसटी वगळता एक लाख रुपयांचा टप्पा गाठेल, असा अंदाज सोने व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. यादिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज होता. मात्र, त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या भावात चढ-उतार होताना दिसले आहे. 01 जानेवारी 2025 रोजी, 24 कॅरेट सोन्याचा दर 77,577 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 31 जानेवारी 2025 रोजी तो 83,107 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला. त्यानंतर आता सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 99,500  इतका झाला आहे. आगामी काळात सोन्याचा भाव असाच वाढत जाईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत एक तोळा सोन्याचा भाव हा 2 लाखांची पातळी गाठेल, असे भाकीत काही तज्ज्ञांनी वर्तविले आहे. तसे घडल्यास लग्नसराईसाठी सोने खरेदी करणे, सर्वसामान्यांना अवघड होईल.

आणखी वाचा

सोन्याच्या दराने सामान्यांना फुटणार घाम; रेकॉर्डब्रेक घोडदौड,आणखी किती दिवस भाव वाढण्याची शक्यता

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.