जेडी व्हान्स यांचे भारतात सहकुटुंब आगमन : भव्य स्वागत, व्यापारविषयक चर्चेला वेग मिळणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचे भारतात आगमन झाले आहे. ते आपली पत्नी उषा आणि तीन अपत्ये यांच्यासह चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय व्यापार मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. व्हान्स यांचे या दौऱ्यात अनेक कार्यक्रम आहेत.
सोमवारी संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी सव्वा तास द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. चर्चेचा मुख्य विषय भारत आणि अमेरिका यांच्यात होणार असलेल्या द्विपक्षीय व्यापार करार हा होता. गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान आदान-प्रदान, व्यापारवाढ, आयात-निर्यात अशा अनेक विषयांवर दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. व्हान्स कुटुंबाच्या भेटीसमयी दिल्लीत कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक मार्गांवरील वाहतून अन्यत्र हलविण्यात आली आहे. विशेषत: दिल्लीच्या संवेदनशील भागांमध्ये अधिक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
दोन्ही नेत्यांचे स्नेहभोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांच्यासाठी विशेष भोजनाचे आयोजन केले होते. व्हान्स यांचे त्यांचे कुटुंबीयही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भोजन कार्यक्रमातही दोन्ही नेत्यांची विविध विषयांवर चर्चा झाली, अशी माहिती देण्यात आली. भोजनाचा कार्यक्रम साधारणत: एक तास चालला होता. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हान्स कुटुंबाला आपल्या अधिकृत निवासस्थानाच्या परिसरही दाखविला. तेथील पक्षी, वृक्ष आदी पाहून व्हान्स यांची अपत्ये आनंदित झाली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रमुख विषयांवर चर्चा केली.
गुणाकार संबंध
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांना अनेक पैलू आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रथम कार्यकाळातही मी त्यांच्यासमवेत काम केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये व्यापार हा महत्वाचा विषय आहे. या संबंधात आमची प्रगती होत आहे. कोणत्याही देशाशी संबंध प्रस्थापित करणे, इतकेच नव्हे, तर आपल्या देशातही विविध घटकांशी संबंध निर्माण करणे, हे एक आव्हान असते. पण या आव्हानांचेच रुपांतर संधीमध्ये करणे आवश्यक असते. अमेरिकेचे नवे कर धोरण हे एक नवे तंत्र आहे. या तंत्रामुळे अनेक परिवर्तने होणार आहेत. मात्र, याचा अर्थ असा नव्हे, की भारत आणि अमेरिका संबंधांवर याचा विपरीत परिणाम होईल, असे प्रतिपादन जेडी व्हान्स यांनी भारतात आगमन झाल्यानंतर केले.
अक्षरधाम मंदिरात दर्शन
सोमवारी सकाळी 9.30 वाजता भारतात आगमन झाल्यानंतर त्वरित व्हान्स कुटुंबाने दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या मंदिराच्या परिसरात त्यांनी अर्धा तास वास्तव्य केले. व्हान्स यांच्या पत्नी उषा या हिंदू असून त्यांचे मातापिता आंध्रप्रदेशातील आहेत. त्यांच्या तीन अपत्यांपैकी एका मुलाचे नाव विवेक असे भारतीय पद्धतीचे ठेवण्यात आले आहे.
कॉटेज एंपोरियमला भेट
भारतात आल्यानंतर व्हान्स यांनी जनपथावरील कॉटेज एंपोरियमला भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलेही त्यांच्यासह होती. त्यांनी या एंपोरियमध्ये अनेक पारंपरिक भारतीय वस्तूंची खरेदीही केली. भारतीय कलाकारांच्या हस्तकौशल्याचे त्यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम साधारणपणे 1 तास चालला होता. यावेळी त्यांच्यासह भारतातील अनेक मान्यवरही होते, अशी माहिती देण्यात आली. या एंपोरियमचे संचालक विनय अग्रवाल यांनी व्हान्स यांच्या भेटीमुळे आपल्याला अत्यानंद झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या एंपोरियममध्ये खरेदी करण्यात व्हान्स यांच्या पत्नी उषा यांनी विशेष रस दाखविल्याचे दिसून आले.
अपत्ये भारतीय वेशभूषेत
भारतात आगमनाच्या वेळी व्हान्स कुटुंबाच्या अपत्यांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा केली होती. इव्हान आणि विवेक हे पुत्र आणि मेरिबेल ही कन्या यांनी भारतीय वेशभूषेतच भारतात आगमन केले. इव्हान आणि विवेक यांनी पायजमा-कुडता असा वेश केला होता, तर धाकटी मेरिबेल ही अनारकली वेशभूषेत होती. त्यांची ही भारतीय वेशभूषा हा आकर्षणाचा बिंदू ठरला होता.
भारतात अनेक कार्यक्रम
व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबियांचे भारतात अनेक कार्यक्रम आहेत. ते जयपूरला भेट देणार असून आग्रा शहराचाही दौरा करणार आहेत. त्यांच्या पत्नी उषा या मूळच्या आंध्रप्रदेशच्या असल्याने त्या आंध्रप्रदेशातील आपल्या मूळच्या गावालाही भेट देण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
500 अब्ज व्यापाराचे लक्ष्य
भारत आणि अमेरिका यांनी आपल्या परस्पर व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सध्या हा व्यापार 140 अब्ज डॉलर्स इतका आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरात लवकर व्यापार करार झाल्यास हे लक्ष्य गाठणे शक्य आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
भारत दौऱ्याला शानदार प्रारंभ
ड अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या भारत दौऱ्याला शानदार प्रारंभ
ड दोन्ही देशांमधील संभाव्य व्यापार करारासाठी हा दौरा पूरक ठरणे शक्य
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हान्स यांच्यासाठी रात्रीचे शाही भोजन