अमेरिकेसोबतच्या टॅरिफ युद्धात अडकलेल्या कॅनडामध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. सध्या मतमोजणी सुरू असून कोणता कॅनडाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
कॅनडातील पब्लिक ब्रॉडकास्टर सीबीसी न्यूजनं प्राथमिक कलानुसार लिबरल पार्टीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
सीबीसीच्या मते, मार्क कार्नी यांचा लिबरल पक्ष कॅनडामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा जिंकू शकतो. मात्र, 343 जागांच्या संसदेत लिबरल पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कितपत खरी ठरते हे लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान, लिबरल पक्षाच्या मुख्यालयात प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पक्षातील एका समर्थकाने म्हटलं की, "हे कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन आहे (कमबॅक) आहे. जेव्हा कॅनडाला गरज होती, तेव्हा कार्नी पुढे आले, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे."
दरम्यान, मागील काही काळातील कॅनडाची परिस्थिती पाहिल्यास तेथील राजकारणात अस्थिरता दिसून येत होती. 2015 पासून लिबरल पार्टी सत्तेत असलेला या पक्षात गेल्या काही महिन्यापासून बरीच राजकीच अस्थिरता दिसून येत होती.
दरम्यान, 2025 च्या सुरुवातीला जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्याच लिबरल पक्षातून त्यांच्यावर मोठा दबाव होता.
मागच्या काही महिन्यांतील परिस्थिती पाहता हा पक्ष जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हं होती. मात्र, आता हा पक्ष चौथ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हं आहेत.
लिबरल पक्षाच्या या विजयात डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचाही काहीसा वाटा असल्याचं बीबीसीचे प्रतिनिधी अँथनी जर्कर याचं मत आहे.
त्यांच्या मते, ट्रम्प यांनी वारंवार कॅनडाला चिथावणी दिली आणि अमेरिकेचे 51 वे राज्य बनण्यास सांगितले, ज्यामुळे कॅनडातील मतदार एकजूट झाले.
व्यापाराबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमक्या, वाढती महागाई आणि घरांचा तुटवडा हे कॅनडाच्या निवडणुकीतील मुख्य मुद्दे राहिले आहेत. त्याचा प्रभाव मतदानावरही दिसून येण्याची शक्यता आहे. असं असलं तरी निकालानंतर काय ते चित्र स्पष्ट होईल.
कोण आहेत मार्क कार्नी?60 वर्षांचे मार्क कार्नी निवडणुकीच्या शर्यतीत पुढे आहेत. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. अर्थात पदभार स्वीकारून त्यांना फार थोडे दिवस झाले आहेत.
मार्क कार्नी यांची लिबरल पार्टीचा नेता म्हणून निवड झाली तेव्हा त्यांच्या पक्षाला 85 टक्के मतं मिळाली होती.
कॅनडा आणि ब्रिटनमध्ये काही जणांना मार्क कार्नी हे चांगलेच परिचित आहेत. ते वित्तीय बाबींचे तज्ज्ञ आहेत. तसंच बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे प्रमुखदेखील होते.
त्यांचा जन्म फोर्ट स्मिथमध्ये झाला आहे. उत्तर भागातून येणारे ते कॅनडाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.
कार्नी यांनी हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात भक्कम भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ते कॅनडाला अमेरिकेचं 51 वं राज्य कधीही होऊ देणार नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की अमेरिका कॅनडाला त्यांचं 51 वं राज्य बनवू इच्छिते.
मात्र आतापर्यंत कार्नी एकदाही कॅनडाच्या संसदेत निवडून गेलेले नाहीत. विरोधकांच्या तुलनेत त्यांचं फ्रेंच भाषेवर चांगलं प्रभुत्व नाही. कॅनडाच्या क्यूबेक प्रांतात फ्रेंच भाषा येणं ही एक सर्वसाधारण बाब आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात जास्त ब्रेक घेतल्यामुळे त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं आहे.
कॅनडात सार्वत्रिक निवडणुका कशा होतात?कॅनडात एकूण 343 मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघाकडे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एक जागा असते.
खालच्या सभागृहात म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सच्या प्रत्येक जागेसाठी मतदान होतं.
तर वरच्या सभागृहातील म्हणजे सीनेटच्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. ते निवडणूक लढवत नाहीत.
ब्रिटनप्रमाणेच कॅनडामध्ये देखील "फर्स्ट-पास्ट-द-पोस्ट" निवडणूक प्रक्रिया आहे.
म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात, तो जिंकतो आणि खासदार होतो. त्यांना एकूण मतदानात बहुमत मिळवण्याची आवश्यकता नसते.
ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात, त्या पक्षाचा नेता सरकार बनवण्याचा दावा करतो. तर दुसऱ्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा मिळतो.
जर कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळालं नाही, तर निवडणुकीच्या निकालाकडे त्रिशंकु संसद (हंग पार्लमेंट) म्हणून पाहिलं जातं किंवा अल्पमतातील सरकारची स्थापना होते.
याचा अर्थ, सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष इतर पक्षांच्या सहकार्याशिवाय कोणतंही विधेयक मंजूर करू शकत नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.