आंध्र प्रदेशात उत्सवाच्या वेळी अपघातात मृत्यू झाला
Marathi May 01, 2025 10:26 AM

मंदिराच्या चंदनोत्सवादरम्यान कोसळली भिंत : 4 जण जखमी

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये श्री वरहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवमादरम्यान बुधवारी पहाटे एका तात्पुरत्या बांधकामाचा 20 फूट लांब हिस्सा कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे पथक शोध अन् बचावकार्य करत आहे. ही घटना पहाटे 2.30 वाजता घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो होतो असे एसडीआरएफच्या जवानाने सांगितले. आंध्रप्रदेशच्या गृह तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री वांगलापुडी अनिता यांनी घटनास्थळाचा दौरा केला. दुर्घटनेपूर्वी जोरदार पाऊस पडत होता. सर्व खबरदारी घेण्यात आली होती, तरीही दुर्घटना घडल्याचे वांगलापुडी अनिता यांनी म्हटले आहे.

दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. प्राथमिक चौकशीत पहाटे 2.30 ते 3.30 दरम्यान अतिवृष्टी झाल्याचे समोर आले. आम्ही या दुर्घटनेसंबंधी अधिक तपास करत आहोत. दुर्घटना स्थळावरील सर्व ढिगारा हटविण्यात आला असून बचावकार्य पूर्ण झाल्याचे राज्याच्या धर्मस्व विभागाचे मुख्य सचिव विनय चैन यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.