मिठ्ठीशाद बोली
esakal May 11, 2025 09:45 AM

- इर्शाद बागवान, saptrang@esakal.com

बागवानी बोली आता-आतापर्यंत फक्त बोलण्या-ऐकण्यापर्यंतच सीमित होती. कुणी बागवानीचे दस्तावेजीकरण केलेले माझ्या ऐकिवात नाही. परंतु हळूहळू ही ‘मिठ्ठीशाद’ (गोड गोड) बोली लिखित स्वरूपात येऊ लागली आहे...

‘आउ नको बोलेतो कोंचे गाडीमें बैटू ऐसा पुच्नेवालेजैसा बरसात चिपीचच चिरचिर चिरचिर चिरचिर चिरकने लगे. सावन गया, भादवा जाने आया तुबी इने उलटी गुलाटी मारते बंदरसरीका परत फिरके सावनके लाईनपर आके दिनभर धूपबरसात धूपबरसात खेलने लगे. गोल्या चुकेलेय लग्तां! अव्वलच कामकू लगेले लोगान्कू हौर काम्कू लगाने लगे.’’

बागवानी बोलीतला हा एक तुकडा!

‘उलटी गुलाटी मारते बंदरसरीका’ म्हणजे ‘कोलांटीउडी मारणाऱ्या माकडासारखा’, ही उपमा येथे फिरुन परत आलेल्या पावसासाठी वापरली आहे. ‘चिरचिर चिरचिर चिरचिर’ अशी पुनरुक्ती वर्णनातील नेमकेपण व्यक्त करते. ‘तुबी’ म्हणजे तरी. तर ‘गोल्या चुकेलेय लग्तां’- हे अस्सल मराठीतल्या ‘गोळ्या चुकल्यात वाटतं’चे सपशेल बागवानीकरण. बोलीभाषेत शिवीमिश्रित शब्दही ओघानेच येतात; ते इथे मुद्दाम टाळले आहेत.

अशा प्रकारे बागवानी ओघात व्यक्त होत राहते आणि ऐकणाऱ्याबरोबर बोलणाऱ्यालाही निखळ आनंद देत राहते.

मी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या मराठी भाषेतील जास्तीत जास्त शब्द बागवानी बोलीत आहेत. ते तसे वापरले जातात, कारण ही बोली इथलीच आहे आणि वर्षानुवर्षे बोलली जाते आहे. आपल्या भोवतालातल्या भाषा टिपून, त्यातील अर्थपूर्ण, नाविन्यपूर्ण शब्द, उच्चार, म्हणी, वाक्प्रचार यांना सामावून घेत, त्याचा योग्य वापर करत बहरत राहिली आहे. खेडोपाडी राहणाऱ्या लाखों लोकांमध्ये ही बोली स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे.

आता ‘आचिंगा’ हा शब्द घ्या. त्याचा अर्थ- ‘असेल’. मी दुसरीकडे कुठल्याही भाषेत हा शब्द बोलला गेलेला आजवर ऐकलेला नाही. पण हा पूर्णपणे वेगळा शब्द अगदी लहानपणापासून आम्ही सहजपणे वापरत आलो. कधी विचारच नाही केला. आता विचार करता वाटते, की तो कानडी भाषेतून अपभ्रंश होऊन आपल्या बोलीत आला असावा का?

कारण अशा उच्चारांचे काही शब्द कानडी भाषेत आढळतात. बहुतेक ‘दखनी’ बोलीभाषा बोलणारे मात्र ‘आचिंगा’ ऐवजी ‘रहिंगा’ हा शब्द वापरतात. असे काही मोजके शब्द दखनी आणि बागवानी बोलीतला फरक ठळक करतात. उदा. ‘की- क्यूँ’, ‘आस्तां- रैता’, इ. बाकी बागवानी ही दखनीची पोटभाषाच. आपल्या प्रमाण मराठीतलं हे वाक्य पहा- ‘काही नाही, जरा पाय मोकळे करुन आलो.’

हे वाक्य आपल्या गावठी बोलीत जसे- ‘काय नाय वो, वाईच पाय मोकळं करुनशान आलू’ म्हणतात; तसा आणि तेवढाच फरक दखनी आणि बागवानीत आहे. बाकी अर्थाअर्थी दोन्ही एकच. बोलण्यातला लहेजा, ढब आणि काही शब्दांचा अधिकउणा फरक काय तो.

आजवर ही बोली दुरुन ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटे. त्यांतील संमिश्र शब्दकळेमुळे असावे किंवा बहुतेक वेळा ही बोली बोलण्याची ढब, लहेजा, यांमुळे किंवा यांत ‘जनरली’ असणाऱ्या ‘कॉमिक सेन्स’मुळे. परंतु अशा बोलीभाषेतून गंभीर, गहन सत्यही ठामपणे मांडता येते, हे मला लवकरच उमजले. उदाहरणादाखल माझी एक कविता इथे देतो-

‘भिकारxx?’

‘हरेक लफ्ज़पर जो़र देते

न्हन्नी छुरी बुली,

‘‘अब्बा, मजे बोलो,

मेरे डब्बेमेंके पैशे का गय?

तीन रुपैच ऱ्हयलेत फकस्त उसमें

सारे के सारे पैशे खरचके दालें’’

मजे लाड आया बच्चेपर,

चेहरा हसरा हुया

छुरी तो पैलेशेच हसरी

अन् चुनचुनीत

उने पैशे जानेका दुख भिसराके

दिलपाश्शे हाशी

अन् बुली,

‘‘तुम्नां लगनेके हाते

करके तुम्नें ले आचिंगे

पन मजे मेरे पैशे परत हुनाय

भलाक्या, तुमारे बड्डेतक.

मजे तुमारेवास्ते गिफ्ट लेनेकाय.

अन् क्या सो पुचू नको हां,

वू दिदीका न् मेरा शिक्रेड हय.’’

मइ परत हाशा

अन् मुंडी निच्चे दाल्के

बिचारमें पड्या

मजबूरीमें की नै हुता,

कौनवद छोऱ्यान्के साठायले

पैशे काढके खानेवाले बापकू

क्या बोल्ते आचिंगे?...

भिकारxx?’

बागवानी बोलणारे मुसलमान शक्यतो आपसांत ही बोली बोलतात. परंतु समाजात वावरताना सर्वच जाती-धर्मांतील, आपापली भाषा बोलणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क येतो. तेव्हा ही बोली बाकी समाजांतील व्यक्तींच्याही कानावर पडत आली आहे. त्यामुळे झाले असे, की जद्वत् मराठी आपल्याला सहज येते, तद्वत् बागवानी ऐकणाऱ्याला सतत कानावर पडल्यामुळे ती सहज बोलता येते.

माझेच नव्हे, तर एकूणच बागवानांचे किती तरी असे मित्र असतील, जे बागवान तर सोडाच, मुसलमान नसले तरी अतिशय उत्तम बागवानी बोलीत आम्हां लोकांशी संवाद करतात. आणि हो, मजेनेच नव्हे, तर ‘सीरियसली’ सहज आणि उत्तम बागवानी बोलू शकतात.

इतकी सफाईने, की एखादा बागवान ते बोलणे ऐकून आपल्या मित्राला सहज विचारुन जातो- ‘‘इनो का वाले रे भै? पैले कबी मिले नै सो? नाव क्या ओ भै तुमारा?’’- तो म्हणतो, ‘सचिन’... आणि समोरचा अचंबित होतो.

तर अशा रीतीने ‘व्यापार करणाऱ्या बागवानांची बोली’ इथपासून सुरु झालेला या बोलीचा प्रवास आज जगातल्या सर्वच क्षेत्रात पोहोचला आहे. आज औद्योगिकच नव्हे, तर सामाजिक, सरकारी, सहकारी क्षेत्रात बागवान समाजातील बरेच तरुण कार्यरत आहेत. ते देशात, परदेशात आपल्या कुटुंबाबरोबर राहतात आणि आपली बोली आपसांत बोलतात. बागवानी जिवंत ठेवण्याचा जाणीवपूर्वक, अजाणता- कसाही असो, प्रयत्न करतात ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

ही बोली दिवसेंदिवस ‘अपग्रेड’ होत रहावी (तशी ती आजवर नेहमीच होत आली आहे.) ही आशा आहे. कोणत्याही भाषेचे/ बोलीचे मुख्य काम- लोकांना जोडणे- हे घडत राहावे, ही अपेक्षा करतो आणि थांबतो!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.