MPSC च्या परीक्षेत वैष्णवी राज्यात मुलींमध्ये प्रथम, कोचिंग न लावता मिळवले असे यश
GH News May 12, 2025 06:08 PM

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला. त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु.म.वि. शाळेत तर माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर येथे झाले आहे. पुढे तिने अभियांत्रिकी शिक्षणासाठी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात अव्वल क्रमांक पटकावला होता. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी ती बाटू विद्यापीठात प्रथम आली होती. वैष्णवी ही मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची कन्या आहे.

नियमित आठ ते दहा तास अभ्यास

वैष्णवी हिने सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतली. त्यानंतर सरकारी सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. वैष्णवी हिने सांगितले की, सुरुवातीला पुण्यात जाऊन अभ्यास सुरु केला. दीड ते दोन वर्ष पुण्यात अभ्यास केला. परंतु एकही क्लास मला चांगला वाटला नाही. त्यामुळे स्वत:च अभ्यास केला. त्यानंतर पहिल्यांदा परीक्षा दिली. परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर सोलापूरमध्ये येऊन घरीच अभ्यास सुरु केला. जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या बळावर तिने हे यश संपादन केल्याचे वैष्णवी हिने सांगितले. कोणतेही कोचिंग क्लास न लावता तिने एमपीएससीचा अभ्यास केला. रोज आठ ते दहा तास अभ्यास करीत होती. त्या माध्यमातून यशापर्यंत पोहचली.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी दोन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यापद्धतीने नियोजन करुन आणि कुटुंबाशी संवाद साधून या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घ्यावा, असै वैष्णवी गायकवाड हिने सांगितले.

एका सर्वसामान्य शिक्षकाची मुलगी क्लास वन अधिकारी झाल्याने वैष्णवी गायकवाड हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ साली घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखती ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर घेतल्या होत्या. त्याची गुणवत्ता यादी लावण्यात आली आहे. त्यात मुलींमध्ये वैष्णवी गायकवाड ही प्रथम आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.