वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा अंतिम सामना होणे अद्याप बाकी आहे. हा अंतिम सामना ११ जूनपासून इंग्लंडमधील लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी पहिल्या दोन क्रमांकांमध्ये स्थान मिळवत अंतिम सामना गाठला आहे.
त्यांनी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड सारख्या बलाढ्य संघांना मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला. आता मंगळवारी (१३ मे) ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही या अंतिम सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात कर्णधारपद तेंबा बवूमा सांभाळणार आहे. त्याच्याच नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. याशिवाय या संघात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडालाही स्थान देण्यात आले आहे.
ड्रग टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर त्याने एक महिन्याची बंदी पूर्ण केली असून आता तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाच्या खेळण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय त्याला साथ देण्यासाठी लुंगी एन्गिडीही असणार आहे.
मात्र, गेराल्ड कोएत्झी आणि १९ वर्षीय क्वेना मफाका यांना दक्षिण आफ्रिकेच्या संघात संधी मिळालेली नाही. याशिवाय एनरिक नॉर्किया आणि हेन्रिक क्लासेन यांचाही संघात समावेश नाही. या दोघांना वार्षिक करारही मिळालेला नव्हता.
पण दक्षिण आफ्रिका संघात नांद्रे बर्गर, डेन पॅटरसन यांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाज म्हणून केशव महाराज आणि अष्टपैलू सेनुरन मुथ्थुसामी यांचाही संघात समावेश आहे. गोलंदाजी फळीत मार्को यान्सिनचाही समावेश आहे.
फलंदाजी फळीत तेंबा बवूमासोबत एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम यांचा समावेश आहे. आक्रमक कॉर्बिन बॉशही संघात आहे.
दरम्यान, हा संघ जरी घोषित झाला असला तरी अद्याप दक्षिण आफ्रिका क्रिकेटने हे स्पष्ट केले नाही की या संघात निवड झालेले खेळाडू पुन्हा आयपीएल २०२५ खेळण्यासाठी येणार की नाही.
आठवड्याभराच्या स्थगितीनंतर आयपीएल २०२५ स्पर्धा १७ मे पासून सुरु होत असून २५ मे ऐवजी आता ३ जून रोजी संपणार आहे. पण ३१ मे पर्यंत दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडला पोहचायचे आहे.
त्यामुळे आयपीएल २०२५ साठी कागिसो रबाडा, लुंगी एनगीडी, एडेन मार्करम, मार्को यान्सिन, रायन रिकल्टन, कॉर्बिन बॉश, विआन मुल्डर आणि ट्रिस्टन स्टब्स यांना २५ मेपर्यंत यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. पण आता आयपीएल २०२५ चा कालावधी वाढला असल्याने दक्षिण आफ्रिका काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.