Pune koyta Gang CCTV Video : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबवेवाडी परिसर कोयता गँगने धुमाकूळ घातलाय. गाडी जोरात चालवल्याच्या किरकोळ वादातून तीन जणांनी कोयत्याने एका व्यक्तीवर सपासप वार केले. बिबवेवाडीमध्ये तीन जणांनी प्रवीण जाधव या तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकरणी ऋतिक बाबू पवार, ओमकार गव्हाणे आणि सूरज शिंदे या तिघा आरोपींना अटक केली आहे. मारहाणीत वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
दहा दिवसांपूर्वी रस्त्याने जात असताना गाडीच्या वेगावरून आरोपींसोबत वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपींनी कोयता हातात घेऊन जाधव यांना धमकावले आणि मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला.
पुणे शहरात कोयता गँगच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. बिबवेवाडी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.