शिवडीत ‘फक्त मराठीत बोलूया’ स्पर्धा उत्साहात
भगवान गौतम बुद्ध - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचे औचित्य
शिवडी, ता. १३ (बातमीदार) ः भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शिवडीतील सम्यक सेवा संघाच्या वतीने ‘फक्त मराठीत बोलूया’ स्पर्धेचे आयोजन केले होते. शिवडीतील विविध स्तरातील मान्यवरांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली.
संघाच्या वतीने धम्मवंदना घेत संविधानाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सम्राट अशोक यांच्या जीवनावर बहुपर्यायी प्रश्नावली स्पर्धा, लहान मुले व मुलींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विवाहित जोडप्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी जे.जे. स्कूल ऑफ आट्र्सचे दया आरेकर यांनी चित्रकला कार्यशाळा भरवली. महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रम पार पडला. टॉप मेलोडीज ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून संगीत मेजवानीचे आयोजन केले होते. बक्षीस समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, असे सम्यक सेवा संघाचे अध्यक्ष संदीप गांगुर्डे यांनी सांगितले.