मधुमेहाच्या ४०० मुलांवर मोफत उपचार
२० वंचित मुलांना इन्सुलिन पंप; हिंदुजा रुग्णालयाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : पी. डी. हिंदुजा रुग्णालय आणि हिंदुजा फाउंडेशन यांनी टाइप एक मधुमेह असलेल्या मुलांसाठी चालवलेल्या आरोग्य उपक्रमाचा विस्तार केला आहे. मंगळवारी (ता. १३) मुंबईत २० वंचित मुलांना पाच वर्षांसाठी इन्सुलिन पंप मोफत दान करण्यात आले. त्यामुळे त्यांना मधुमेहाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
२०१९ पासून सुरू असलेल्या टाइप एक डायबिटीज इनिशिएटिव्हअंतर्गत आतापर्यंत ४०० मुलांना मोफत उपचार व वैद्यकीय सेवा देण्यात आल्या आहेत. संस्थेने या उपक्रमासाठी ११ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांनी घटले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना यांच्या मते, ही सेवा वंचित मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत असून, दर्जेदार उपचार सर्वांपर्यंत पोहोचावेत, यासाठी संस्था कटिबद्ध आहे. डॉ. फुलरेणू चौहान यांनी इन्सुलिन पंपाद्वारे रक्तातील साखरेचे नियंत्रण व जीवनमान सुधारण्यावर भर दिला. महागड्या औषधोपचारामुळे अनेक गरीब कुटुंबांतील मुलांना योग्य उपचार मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन हिंदुजा फाउंडेशन त्यांच्या वैद्यकीय खर्चाची पूर्ण जबाबदारी उचलत आहे.