सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मनीषा माने मुसळे यांच्या खात्यातील रकमेची सखोल चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्यावर न्यायालयाने मनीषा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
दरम्यान, वेगळे कारण असतानाही आर्थिक गैरव्यवहारातून आत्महत्या केल्याचा नवा जावईशोध पोलिसांनी लावल्याचे मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात सांगितले. शेकडो कोटींचा मालक असलेले डॉ. शिरीष अशा किरकोळ रकमेमुळे आत्महत्या करतील, हे कोणालाच पटणारे नाही, असाही युक्तिवाद केला. जामीन अर्जास अडचण यावी म्हणून पोलिसांनी नवा मुद्दा उपस्थित केल्याचेही ॲड. नवगिरे म्हणाले. परंतु, गुन्हा हाय प्रोफाइल असल्याने न्यायालयाने मनीषा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
पोलिसांचे कोर्टात म्हणणे...
डिसेंबर २०२४ पासून मनीषा यांच्याकडील प्रशासकीय अधिकार डॉ. शिरीष यांनी स्वत:कडे घेतले होते. त्यावरून चिडलेल्या मनीषा यांनी आत्महत्येची आणि इज्जत धुळीला मिळविते म्हणून धमकी दिली होती. मनीषा आपली बदनामी करेल, या भीतीने डॉक्टरांनी आत्महत्या केली, असा मुद्दा तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडला. पोलिसांनी २५ दिवसांत रुग्णालयातील ४२ जणांचे साक्षीदार म्हणून जबाब घेतले. रुग्णालयाचे सीए गिरीशचंद्र चाफळकर यांच्याकडेही तपास केला. त्यावेळी ८ एप्रिल २०२२ ते ७ डिसेंबर २०२४ या काळात मनीषा यांनी स्वत:च्या तीन बॅंक खात्यांत ३९ लाख ८७ हजार ६८० रुपये अनधिकृतपणे घेतल्याची बाब समोर आली.
रुग्णालयातील पाच व्यक्तींना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून ऑनलाइन रक्कम स्वत:च्या खात्यात घेतली. रुग्णालयाच्या कॅशिअर शीतल केत या मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांकडून दहा हजारांपर्यंत रक्कम रोखीने घेत होत्या. आयकर न भरलेले ७० लाख ४३ हजार १६० रुपये मनीषा यांच्या खात्यात आढळले. उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय असून, मनीषा यांनी पगारीचा पैसा कोठे वापरला, अशा बाबींचा तपास करायचा असल्याने पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी देखील तपास अधिकाऱ्यांनी यावेळी न्यायालयात केली होती. यावेळी कोठडीला विरोध करत मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जोरदार युक्तिवाद केला.
मनीषा यांच्या वकिलांचा युक्तिवाद
डॉ. शिरीष यांच्या सुसाईड नोटमध्ये ‘ज्याला मी शिकवून आज एओ केले आणि चांगला पगार देतो आहे, त्याने खोटारडे, घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे अतीव दु:ख आहे, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे’ असा मजकूर आहे. कोठेही आर्थिक गैरव्यवहारावर भाष्य नाही; तरीदेखील पोलिसांनी पूर्वीचेच मुद्दे मांडले.
मनीषा यांचा पगार दरमहा पावणेदोन लाख रुपये
डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या २००८ पासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना दरमहा एक लाख ८० हजार रुपयांपर्यंत पगार होता. रजेचे पैसे असे मिळून त्यांना दरमहा सरासरी दोन लाख रुपये मिळत होते. त्यामुळे त्यांच्या खात्यातील रक्कम आणि डॉक्टरांची आत्महत्या, याचा काहीही संबंध नसल्याचा मुद्दादेखील ॲड. नवगिरे यांनी यावेळी उपस्थित केला होता.
आर्थिकचा काय संबंध? कोर्टाकडूनही विचारणा
आत्महत्येचा आर्थिक मुद्द्याशी संबंध काय? अशी विचारणा सुनावणीच्या वेळी न्यायाधीश विक्रमसिंह भंडारी यांनी तपास अधिकाऱ्याला केल्याचे दिसून आले.