Pune Latest News : नोंदणी कार्यालयात बनावट दस्त नोंदणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे प्रकार सर्सासपणे होत आहेत. या गंभीर प्रकाराच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे-पाटील यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे.
सदर प्रकरणात काही व्यक्तींनी संगनमत करून खोटे दस्त तयार करून, बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी केली आहे. अशाच पद्धतीचे बेकायदेशीर दस्त केवळ पुण्यातच नव्हे संपूर्ण राज्यात नोंदवले जात असल्याचे वारंवार समोर येत आहेत. अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांची आयुष्यभराची संपत्ती गमावण्याचा धोका निर्माण होतो. एकदा बोगस दस्त नोंदला गेल्यानंतर, मूळ मालकाला न्याय मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागतो. यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रासास त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते, असेही या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व अश्या बेकायदेशीर प्रकाराला आळा घालावा, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे यावेळे सुरवसे-पाटील यांनी सांगितले.
'वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन' योजनेचा गैरफायदा घेत काही व्यक्ती दुसऱ्या तालुक्यात जाऊन फसवणूक करत आहेत. म्हणजेच एका तालुक्यातील जमिनीचा दस्त दुसऱ्या तालुक्यात नोंदवला जातो आणि यामध्ये मूळ मालकाच्या नकळत खोटी विक्री केली जाते. सासवड येथील नोंदणी कार्यालयात बनावट व्यक्ती उभी करून नोंदणी केल्याचा प्रकारही नुकताच घडला असून त्याचे दस्त क्रमांकही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.