ढिंग टांग
सदू : (सावधपणाने फोन फिरवत) म्यांव म्यांव…गुर्रर्र गुरुर्रर्र…!
दादू : (बेसावधपणाने फोन फिरवत) बोला, बोकेभाऊ!! काय म्हणताय? डरकाळताय की ढेकर देताय?
सदू : (रागावून) बोकेभाऊ कोणाला म्हणतोस?
दादू : (साळसूदपणाने) सदूराया, तू आहेस होय! मी ओळखलाच नाही तुझा आवाज!! मला वाटलं खरंच कुठलं तरी मांजर ओरडतंय! हाहा!!
सदू : (मानभावीपणाने) युरोपच्या दौऱ्यावरुन कधी आलास?
दादू : (खुशीत) कध्धीच!! येऊन कामालासुद्धा लागलो! तूसुद्धा कुठेतरी परदेशी गेला होतास ना?
सदू : (हळू आवाजात) बाली बेटांवर गेलो होतो! पण लगेच परत आलो!! कसा झाला युरोपचा दौरा?
दादू : (खुशीत) मस्त! चिक्कार हिंडलो!!
सदू : (टोमणा मारत) तिथं बरा हिंडतोस! इथं घरातून बाहेर पडणं तुला शिक्षेसारखं वाटतं…हो ना?
दादू : (रागावून) खामोश! काहीही बोलू नकोस! मी इथेसुद्धा खूप फिरतो! परवाच भिवंडीला जाऊन आलो!
सदू : आपण नव्हतो त्या काळात काय काय घडलं, कळलं ना?
दादू : (कुतुहलानं) काय घडलं, काय घडलं बरं?
सदू : (भयचकित करणाऱ्या आवाजात) युद्ध झालं, युद्ध !!
दादू : (आश्चयचकित होत) मला वाटलंच होतं तसं होणार, ते राजदवाले तसं सोडणार नाहीत, त्या कमळवाल्यांना!
सदू : (वैतागून) बिहारमधल्या निवडणुकीबद्दल नाही सांगत दादूराया, भारतीय लष्करानं पाकड्यांची जिरवली चांगलीच!!
दादू : (खाडकन सलाम ठोकत) भारतीय सैन्याचा विजय असो!!
सदू : (ऐकू न आल्यानं) हल्लो…कुठं गायब झालास? हल्लो…हल्लो…!
दादू : (पुन्हा लाइनवर येत) सलाम ठोकताना फोन पडला…सॉरी!
सदू : (नाक वाकडं करत) पहिल्यापासूनच तू असा वेंधळा आहेस! इतकं सगळं घडून गेलं, आख्खा देश युद्धाच्या वातावरणानं भारलेला होता, पण तू कुठे होतास?
दादू : (ताठ मानेनं) मला माझ्या लष्कराचा विलक्षण अभिमान वाटतो! या युद्धप्रसंगी आम्ही सगळे विरोधक मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहिलो, म्हणून आपल्याला विजय प्राप्त झाला!
सदू : (तिरसटपणाने) मोदी सरकारचा काय संबंध? विजय लष्कराचा झाला! हे गेले होते का बंदुका घेऊन लढायला? का तुम्ही गेला होता?
दादू : (थोरल्या भावाच्या भूमिकेत शिरत) तुला कळत नाही! काहीही बोलतोस तू!! ही वेळ राजकारणाची नसते!
सदू : (टोमणा मारत) युरोपला हिंडायला जाण्याची असते?
दादू : (चिडून) तू तरी कुठं इथं होतास? आपण सांगे लोकांना, आणि रुमाल आपल्या नाकाला..!!
सदू : (धोरणीपणानं नमतं घेत) तू आलास, माझ्या जीवात जीव आला!!
दादू : (दिलासा देत) सदूराया, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! आता मी इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे! पुढल्या उन्हाळ्यापर्यंत आता कुठेही जाणार नाही!
सदू : (मूळ मुद्द्यावर येत) आता आपण कसं करायचं? आय मीन ‘ऑपरेशन पालिका’ मोहीम छेडण्याची वेळ समीप आली आहे!! परदेशी जाण्यापूर्वी आपलं काय ठरलं होतं, ते आठव!
दादू : (अभिमानानं) डोण्ट वरी! मी लागलोसुद्धा कामाला!! पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्याचं काम चाललं आहे! काहीही झालं तरी मशाल पेटणारच! किंबहुना पेटवल्याशिवाय राहणार नाही! का नको पेटवू? पेटवणारच!
सदू : (काळजीच्या सुरात) अरे, आपल्या संभाव्य टाळीचं काय?
दादू : (डायलॉग मारत) वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा, वहां से टाली मिलेगी तो यहां से…जुळव आता यमक! जय महाराष्ट्र!