LSG vs SRH Live : रिषभ पंत संघ आज हरला, तर घरी जाणार; हैदराबादने टॉस जिंकून केली कोंडी, Will O'Rourke चे लखनौकडून पदार्पण
esakal May 20, 2025 12:45 AM

IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि प्ले ऑफमधील तीन संघ निश्चित झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी अजूनही तीन संघ शर्यतीत आहेत आणि त्यापैकी एक संघ म्हणजे लखनौ सुपर जायंट्स... रिषभ पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असला तरी त्याला पैशाचं दडपण झुकवताना दिसलं. त्याचा खराब फॉर्म LSG ला मारक ठरला आहे. आज त्यांना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचे आहे, ज्यांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले आहे. LSG ला स्पर्धेत राहायचे असेल तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील.

लखनौसाठी निकोलस पूरन हाच एकटा खिंड लढवताना दिसतोय. त्याने आयपीएल २०२४ नंतर आतापर्यंत सर्वाधिक ७० षटकार खेचले आहेत. त्यानंतर अभिषेक शर्मा ( ५९) याचा क्रमांक येतो. तेच या कालावधीत ५०० हून अधिक धावा करणाऱ्यांमध्ये अभिषेकचा ( १९४) स्ट्राईक रेट हा पूरनपेक्षा ( १८८) जास्त आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांमधील स्पर्धा पाहायला मजा येईल.

निकोलसने ४१०, मिचेल मार्शने ३७८, एडन मार्करम व आयुष बदोनी यांनी अनुक्रमे ३४८ व ३२६ धावा केल्या आहेत, तेच रिषभला ११ सामन्यांत १२८ धावा करता आल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरही ( १५३) अपयशी ठरला आहे.

हैदराबादची तोफ शांत ठेवण्यात सर्वच संघांना यश आले आहे. अभिषेक शर्मा ( ३१४) व हेनरिच क्लासेन ( ३११) वगळल्यास अन्य फलंदाज तीनशेपार गेलेला नाही. लखनौकडे सर्वात अनुभवी गोलंदाजांची फळी आहे, तरीही त्यांनी पॉवर प्लेमध्ये १०.५ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत, याबाबतीत सनरायझर्स हैदराबादल १०.१च्या सरासरीने दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लखनौची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याचे समालोचकांनी सांगितले. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विल ओ'रौके आज लखनौकडून आयपीएलमध्ये पदार्पण करतोय. हैदराबादच्या संघात ट्रॅव्हिस हेड व जयदेव उनाडकत हे नाहीत, तर हर्ष दुबे पदार्पम करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.