Latest Marathi News Updates : तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपीला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी
esakal June 08, 2025 04:45 PM
तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपीला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी

तुळजापुर येथील ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी विनोद गंगणे याला न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली असली तरी न्यायालयाने सोमवारपर्यंतची कोठडी मंजूर केली. 14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथून ड्रग्ससह तिघांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा मोठा छडा लागला. यामध्ये मुंबई, पुणे आणि सोलापूरशी संबंधित महत्त्वाच्या कनेक्शनचा उलगडा झाला असून आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 17 आरोपी अजूनही फरार आहेत.

बीडमध्ये कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कुख्यात दरोडेखोराला अटक

बीड जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर भगवान ईश्वर भोसले याला नागझरी येथून पहाटे दोन वाजता अटक केली. तो आपल्या तिसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी नागझरीला आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. आरोपीने पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सावधगिरीमुळे तो निष्फळ ठरला. महिलांनीही पोलिसांवर आक्रमक होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या सहकार्याने ही धडक कारवाई यशस्वी झाली.

नागपूर महापालिका प्रशासन आता डिजिटल ट्रकवर

नागपूर महापालिकेने दैनंदिन प्रशासकीय कामकाजात ई ऑफिस डिजिटल प्रणालीचा वापर सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागापासून या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या एकूण 48 विभागांमध्ये कागद विरहित कामकाज होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी काही विभागांमध्ये ही प्रणाली लागू केली होती, त्याच धर्तीवर आता नागपूर महापालिकाही डिजिटल ट्रकवर येत आहे. यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार असून, नागरिक आणि अधिकारी दोघांनाही याचा थेट फायदा होणार आहे.

Pune : बस वेळेत सुरू ठेवा, प्रवासी संख्या वाढवा; पीएमपी अध्यक्षांचा आगारप्रमुखांना आदेश

वारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे संचलनातील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना बसची वाट पहावी लागते सर्व मार्गावरील बसची वारंवारता नियोजित वेळेत सुरू ठेवा, असे आदेश पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत नुकतेच पीएमपीने तिकीट दर वाढविले आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे बस मार्गावर सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

Raigad : तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार

किल्ले रायगडावर 9 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील देण्यात आले असून त्यांचा दौरा आला नसला तरी ते देखील येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर मंत्री, स्थानिक खासदार आणि आमदार यांना देखील निमंत्रण दिल असून हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी शिवप्रेमींनी उपस्थित रहावं असं निमंत्रण मंत्री भरत गोगावले यांनी दिल आहे.

Pune : महसूलनंतर पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर, आकडेवारी आली समोर

महसूल पाठोपाठ पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गेल्या पाच महिन्यात केलेल्या कारवाईतून आले दिसून

एक जानेवारी ते 31 मे पर्यंत महसूल विभागात सहा तर पोलीस विभागात पाच कारवाई

पुणे विभागात मार्च महिन्यात सर्वाधिक सहा गुन्हे लाचखोरी प्रकरणी नोंदवले गेले

भ्रष्टाचारात पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असल्याचे आले समोर

पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई मधून आकडेवारी समोर

Raigad : रायगडावर असणाऱ्या धनगर वस्तीला पुरातत्व खात्याच्या नोटीसा

रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड रिकामा करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. धनगर समाजाची ही लोक झोपडीवजा घर बांधून गेल्या सात पिढ्यांपासून रायगड किल्ल्यावर रहात आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही, ताक, चहा, नाष्ट्याची सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गडावरील बाजार पेठ आणि जगदीश्वर मंदीरच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्ती असून केंद्रीय पुरातत्व विभागाने ही वस्ती खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

Akola : विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी मोठा निर्णय घेतला. मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रीवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थित भरगड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Gadchiroli : गोदावरी नदीत ६ मुलं बुडाली, शोध सुरू

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणा हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीत सहा मुलं बुडाली आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडालीय. अंघोळीला गेलेली मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पण मुलं सापडली नव्हती.

Pune News : पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या धडकेनंतर डंपर उलटला

पुणे सातारा महामार्गावरील केळवडे येथे कंटेनरची डंपरला धडक बसून अपघात झाला. डंपरचा मागचा टायर फुटल्यानं डंपर उलटला. पुण्याच्या दिशेने जात असताना मालवाहू कंटेरनरने डंपरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर डंपरचा टायर फुटून डंपर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Pune Rain : पुण्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

मान्सूनची उत्तर सीमा ही स्थिर असून पूर्व विदर्भ ते अंतर्गत कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत द्रोणिका रेषा जात आहे. या प्रभावामुळे पुण्यात रविवारीही वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.