आनंद हा तुमचा मूळ स्वभाव आहे
esakal June 10, 2025 01:45 PM

सद्गुरू

आनंद कशाबद्दल आहे? आनंद नक्कीच एका ठरावीक गोष्टीबद्दल नाही, कारण आनंद म्हणजे अशी गोष्ट नाही जी तुम्ही तयार करता, आनंद हे असे काही आहे जे तुम्ही बनता; ती जगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुमच्या शरीराने एक ठरावीक सुखदपणा प्राप्त केला, तर आपण त्याला सुख म्हणतो. जर तुमच्या मनाने एक ठरावीक सुखदपणा प्राप्त केला, तर आपण त्याला शांती किंवा आनंद म्हणतो. जर तुमच्या जीवनऊर्जेने ठरावीक सुखदपणा प्राप्त केला, तर आपण त्याला आनंद म्हणतो. तुम्ही तुमच्या आतील जीवनाच्या मूलभूत प्रक्रियेला विचलित केले नाही, तर आनंद हा स्वाभाविक परिणाम आहे. आनंद ही काही साध्य करण्याची गोष्ट नाही; आनंद हा तुमचा मूळ स्वभाव आहे.

तुम्ही कदाचित म्हणाल, ‘या समाजात इतके दुःख आहे, मी आनंदी कसा राहू शकतो?’ जर तुमच्या आजूबाजूचे सगळे वातावरण दुःखी बनले असेल, तर सर्वोत्तम गोष्ट, जी तुम्ही करू शकता, ती म्हणजे आनंदी राहणे. नाहीतर हे जग विसरून जाईल, की आनंद नावाची एक गोष्ट आहे. तुमच्या जीवनात काहीतरी चुकीचे घडले आहे किंवा बाह्य परिस्थितीने ते निर्माण केले आहे, म्हणून नाही (बाह्य परिस्थिती शारीरिक वेदना निर्माण करू शकते, यातना नाही), तर तुमचे मन तुम्हाला जे करायचे आहे ते करत नसल्यामुळे दुःख आणि यातना निर्माण होतात. समाजाला दोष देणे खूप सोपे आहे; परंतु स्वतःवर कोणताही बाह्य प्रभाव पडला, तरी तो त्यातून काय करू इच्छितो याची आंतरिक निवड प्रत्येकाकडे असते.

संपूर्ण शास्त्र आणि ज्ञान ज्याला आपण आंतरिक विज्ञान म्हणतो, ते याबद्दल आहे, की आनंद म्हणजे अशी गोष्ट नाही, जी तुम्ही तुमच्या जीवनात साध्य करू शकता, तर तो आपल्या जीवनाचा मूळ आधार म्हणून पाहणे. हे असे घडले, तरच इतर गोष्टी घडू शकतात. नाहीतर, सतत, तुम्ही अशा भीतीखाली जगाल, की दुःख तुमच्यावर झडप घालत आहे. बाहेरून, शारीरिकदृष्ट्या, काहीही घडू शकते; पण बाहेर काय घडू शकते यापेक्षा जास्त, तुमची भीती ही तुम्ही दुःखी, चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त होण्याबद्दल आहे; म्हणून तुम्ही तुमच्या आत काय घडू शकते याची काळजी घेतली पाहिजे.

आनंदासाठी तुम्ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असाल, तर तुम्हाला हे समजून घ्यायला हवे, की बाहेरच्या गोष्टी कधीही १०० टक्के तुम्हाला हव्या तशा घडत नाहीत. जेव्हा ही वास्तविकता असते, तेव्हा किमान एक व्यक्ती - तुम्ही - तुम्हाला हवी तशी घडली पाहिजे. जर तुम्ही तुम्हाला हवे तसे घडला असाल, तर आनंद हीच स्वाभाविक निवड असते. ही अशी गोष्ट नाही, जिच्या मागे तुम्हाला जायचे आहे. तुम्ही तुमचा मूळ स्वभाव शोधलात, तर आनंदी असणे हा तुमचा एकमेव मार्ग असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.