Muncipal Election : कामाला लागा! निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे वेळापत्रक जाहीर
esakal June 13, 2025 06:45 PM

Maharashtra Politics : कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह इतर ‘ड’ वर्ग महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे वेळापत्रक आज नगरविकास विभागातर्फे जाहीर करण्यात आले. यानुसार एक सप्टेंबरला अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रभागरचनेची तयारी करण्याचे आदेश आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आता अधिकृतरीत्या वेळापत्रक जाहीर केल्याने या कामाला गती येणार आहे.

आगामी महापालिका नरगविकास विभागाने महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्तांनी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या कार्यक्रमानुसार ११ ते १६ जून या कालावधीत प्रगणक गटाची मांडणी करणे व प्रारूप प्रभागरचना तयार करणे.

१७ ते १८ जूनपर्यंत तपासणे, १९ ते २३ जूनपर्यंत स्थळ पाहणी करणे, २४ ते २६ जूनपर्यंत गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, २७ ते ३० जूनपर्यंत नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणे, एक ते तीन जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, चार ते आठ जुलैपर्यंत प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला पाठविणे, १५ ते २१ जुलैपर्यंत प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती, सूचना मागविणे ही कार्यवाही करण्याची सर्व जबाबदारी आयुक्तांवर आहे.

तसेच २२ ते ३१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घ्यायची आहे. ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. एक ते सात ऑगस्टपर्यंत सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना मान्यतेसाठी पाठविणे. त्यानंतर २२ ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभागरचना महापालिका आयुक्तांनी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावयाची आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.