म्युनिक : भारताची १९ वर्षीय हरहुन्नरी नेमबाज सुरुची सिंग हिने मोठा पराक्रम केला. सलग तिसऱ्या विश्वकरंडक नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. भारताची गोल्डन गर्ल म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरुचीने येथे सुरू असलेल्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये आपला सुवर्ण ठसा उमटवला.
आज झालेल्या अंतिम सामन्यात सुरुचीने सर्वाधिक २४१.९ गुणांची कामगिरी करताना पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या फ्रान्सच्या कॅमिली जेद्रजेवस्कीवर मात केली. रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या कॅमिलीने २४१.७ अशी झुंज दिली. चीनच्या याओ क्विनझुआन हिला (२२१.७) ब्राँझपदक मिळाले.
ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या मनू भाकरला हरवून राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या सुरुचीने या अगोदर ब्युनोस आर्यस आणि लिमा येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धांतही सुवर्णपदक जिंकले होते. ब्युनोस आयर्स येथील स्पर्धेत तर तिने पदार्पण केले होते.
राष्ट्रीय स्पर्धेतील फॉर्म आणि आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या सुरुचीने पात्रता फेरीत ५८८ गुण मिळवून मनू भाकरच्या राष्ट्रीय स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी केली. आजच्या स्पर्धेत ५७४ गुणच मिळवू शकलेल्या मनू भाकरला २१व्या तर पलक हिला ५७० गुणांसह ३०व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पात्रता फेरीतच बाद झालेली मनू लगेचच अंतिम फेरीसाठी समालोचक झाली आणि तिने सुरुची सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिचे गोड कौतुक केले. अंतिम सामन्यात सुरुची नर्व्हस दिसून येत होती. सुदैवाने मी सुवर्णपदक जिंकू शकले, असे मत सुरुचीने व्यक्त केले. गेल्या दोन विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या तुलनेत ही लढत संघर्षपूर्ण होती, असेही ती म्हणाली. म्युनिक येथे सुरू असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.