Rohit Sharma funny fan encounter viral in Mumbai : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो त्याच्या चाहत्याच्या कृतीवर थोडा नाराज दिसला. मुंबईतील हा व्हिडीओ आहे आणि पाऊस पडत असताना रोहितला त्याच्या गाडीत जाण्यापूर्वी चाहत्यांमधून वाट काढावी लागत असल्याचे दिसत आहे. या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, चाहत्यांनी त्यावर प्रचंड प्रेम व्यक्त केलं आहे. अनेक जण म्हणत आहेत, “हा माणूस कसा कोणाला आवडणार नाही?”
३८ वर्षीय रोहितने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो फक्त भारताकडून वन डे क्रिकेट खेळणार आहे, कारण मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. या वर्षाच्या सुरवातीला ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांच्या दौऱ्यात रोहितला संघर्ष करावा लागला होता. ३ सामन्यांमध्ये त्याने फक्त ३१ धावा काढल्या होत्या. त्यानंतर त्याने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने ६७ कसोटींत १२ शतकांसह ४३०१ धावा केल्या आहेत.
Viral Video मध्ये रोहित मराठीतून गंमत करताना दिसतोय. "अरे काय करतो तूझं मला समजत नाही, पुर्ण गोंधळ करून टाकला तुम्ही, चला भेटतो.''
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यापूर्वी आयुषने मुंबईतील निवासस्थानी रोहित शर्माची भेट घेतली. रोहितने यावेळी आयुषला स्वाक्षरी केलेली बॅट भेट दिली. आयुषने नंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून हे सांगितले.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा दौरा २४ जून रोजी ५० षटकांच्या सराव सामन्याने अधिकृतपणे सुरू होईल. त्यानंतर, संघ इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची रेड-बॉल मालिका खेळेल.