मी रामदास आठवले घराण्याचा…कवितांचा संदर्भ येताच फडणवीसांचं खास विधान; असं का म्हणाले?
GH News June 21, 2025 10:06 PM

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाच रेडिओ जॉकींनी एक मुलाखत घेतली. ही मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. कारण फडणवीस यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिलखुलासपणे दिली आहेत. या मुलाखतीत त्यांनी लिहिलेल्या कविता, गीतांबद्दल विचारण्यात आलं. केलेल्या मॉडेलिंगबद्दलही फडणवीस यांनी बरीच माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या कवितांविषयी सांगताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नाव घेत मिश्किल भाष्य केलं.

नंतर मॉडेलिंगची मी कधीही हिंमत केली नाही

देवेंद्र फडणवीस यांनी कधीकाळी मॉडेलिंग केलेलं आहे. त्यांचे काही फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. सोबतच फडणवीस हे कवी, गीतकार आहेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर मॉडलिंग हा अपघात होता. मित्रांनी केलेला प्रँक होता. पण नंतर मॉडेलिंगची मी कधीही हिंमत केली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यावेळी मॉडलिंग गाजली कारण, कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

मी रामावर गाणं लिहिलं, मी…

कविता आणि गीत लिहण्याच्या आवडीविषयीही त्यांनी बरंच काही सांगितलं. राम जन्मभूमीवेळी मी रामावर गाणं लिहिलं. शंकरावर गाण लिहिलंय. शंकर महादेवन यांनी ते गाणं गायलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच मी आणखी एक गाणं लिहिलेलं आहे. पण त्याचा शोध तुम्हीच घ्या, असंही ते म्हणाले.

तसा मी रामदास आठवले…

लिहिलेल्या कवितांबद्दल बोलताना फडणवीस यांनी रामदास आठवले यांचे नाव घेतले. तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, असं फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. तसेच त्यांनी तुम्ही आहात आरजे तुम्हाला एत नाही फारसे, बाहेर लावलेत, अशी एक शीघ्रकविताही केली. पुढे त्यांनी लिहिलेली एक कविताही त्यांनी म्हणून दाखवली.

आशिष शेलार काय म्हणाले?

या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांनीही अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. अगोदर दुसरे कोणतेही माध्यम नव्हते. तेव्हापासून आतापर्यंत सांस्कृतिक परंपरेचे काम जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम रेडिओने केले. आता यात अनेक बदल झाले. हे मोठे मध्यम आहे. म्हणून त्यांना सन्मानित केलं पाहिजे. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून देशात पहिल्यांदा आपल्या राज्याने आशाताई यांच्या नावाने पुरस्कार दिला, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. आशाताईंचे आभार मानावे एवढा मोठा मी नाही. आम्ही त्यांचे गाणे ऐकत मोठे झालो, अशी भावनाही शेलार यांनी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.