Umesh Patil : राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे जंगी स्वागत; शेटफळपासून चारशे गाड्यांची रॕली
esakal June 24, 2025 07:45 AM

मोहोळ/नरखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे मोहोळ नगरीत सात जेसीबीतून पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीत व मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले.

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ

रविवारी सकाळी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून दुपारी शेटफळ (ता. मोहोळ) येथे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले. शेटफळ येथून चारशेहून अधिक चारचाकी वाहनांच्या रॕलीला सुरवात झाली. तत्पूर्वी पाटील यांचा शेटफळ येथे सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी सत्कार केला. मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सात जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून दीडशे किलो वजनाचा हार घालण्यात आला. जिल्हाध्यक्षांसोबत सुमारे पाच किलोमीटर रॕलीने मोहोळ शहरवासीयांनी स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. तेथून ही मिरवणूक तहसील कार्यालय, नगर परिषद, आदर्श चौकमार्गे गवत्या मारुती चौक ते सावली बंगला येथे समाप्त करण्यात आली. रॕलीत पाटील यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील व कन्या शक्ती पाटील यांनी राष्ट्रवादाचा ध्वज घेऊन सहभाग घेतला. रॕलीत माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, शिवसेनेचे विकी देशमुख, अण्णासाहेब पाटील, शिवराज जाधव, अशोक क्षीरसागर, रामेश्वर मासाळ, वर्षा शिंदे, सुप्रिया गुंड-पाटील, पंडित भोसले, अभिषेक आव्हाड, नरखेडचे सरपंच बाळासाहेब मोटे, जयवंत पाटील, ज्ञानेश्वर गोठणे, मोहोळ तालुका व जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी करणार

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची जुनी कार्यकारिणी बरखास्त केली असून नवीन कार्यकारिणी करण्यात येणार आहे. या कार्यकारिणीत पक्षासाठी काम करण्याची धडपड असणाऱ्या सर्व जाती, धर्माच्या लोकांना निश्चितपणे संधी देण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

सीना-भोगावती जोडकालवा होणार

सीना भोगावती जोड कालवा प्रकल्प महायुतीच्या काळातच पूर्ण होणार आहे. मोहोळ, माढा व बार्शी तालुक्यातील सीमावर्ती भागातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार आहे, असेही उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शरद पवारांचे चार आमदार आमच्यासोबत

माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवली आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. ज्यांचे पूर्वीचे काम चांगले आहे, त्यांचा पुन्हा विचार केला जाईल. नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबाबत पुन्हा जनता दरबार सुरू करण्यात येणार आहे. येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद या निवडणुकांत कार्यकर्त्याचा उत्साह टिकवून ठेवणे माझे काम आहे. ज्यांनी डीसीसी बँक बुडविली त्यांनी त्यांच्या मुलांना संधी देण्याचा घाट घातला आहे, हे चालू देणार नाही. गावोगावच्या सहकारी सोसायट्या व त्यातील कर्मचारी हे नेत्यांच्या गुलामगिरीत आहेत. त्यात पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असे पाटील यांनी मोहोळमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्री, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने निधीची कमतरता पडणार नाही. शरद पवार यांचे चार आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांच्याशी संपर्कात राहणार असल्याचेही पाटील म्हणाले

Ashadhi Wari: ‘झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ४२ ठिकाणी स्वच्छता, १४८ टन कचरा जमा

भीमा कारखाना मल्टिस्टेट होऊ देणार नाही

भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत त्यांना विचारले असता पाटील म्हणाले, भीमा कारखान्याच्या निवडणुकीत तो चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून आम्ही खासदार धनंजय महाडिक यांना मदत केली, त्यांच्यासोबत राहिलो होतो. मात्र आता त्यांनी कारखाना मल्टिस्टेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो होऊ देणार नाही. आम्ही सभासदांच्यासोबत आहोत. खासदार महाडिकांच्या निर्णयाला आमचा विरोध राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.