टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यातील सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने टीम इंडियावर पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स विजय मिळवला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र या सामन्यात उपकर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इतिहास घडवला. ऋषभ पंतने उपकर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात धमाका केला. पंतने लीड्समध्ये दोन्ही डावात शतक ठोकलं. पंत विदेशात दोन्ही डावात शतक करणारा पहिला विकेटकीपर बॅट्समन ठरला. पंतला त्याने केलेल्या या कामगिरीची बक्षिस मिळालं आहे. आयसीसीने पंतला गिफ्ट दिलं आहे.
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी 25 जून रोजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऋषभ पंतने फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पंतने कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्त स्थान पटकावलंय. पंतने बॅटिंग रँकिंगमध्ये सातवं स्थान मिळवलं. पंतला दोन्ही डावात केलेल्या शतकी खेळीमुळे हा फायदा झाला. पंतने लीड्समध्ये पहिल्या डावात 134 तर दुसऱ्या डावात 118 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने चौथ्या डावात 371 धावांचा यशस्वी पाठलाग केला.
शुबमन गिल याचा कसोटी कर्णधार म्हणून इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना होता. गिलने कर्णधार म्हणून पदार्पणात शतक केलं. गिलला या शतकी खेळीचा फायदा झाला. गिलने रँकिंगमध्ये 20 व्या स्थानी झेप घेतली.
ऋषभ पंत याने यासह भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठ्या विक्रमांपैकी एक विक्रम त्याच्या नावावर केला. पंतच्या खात्यात आता 801 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. ऋषभ भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 800 रेटिंग्स पॉइंटसचा टप्पा गाठणारा पहिला विकेटकीपर ठरला आहे. पंतआधी कोणत्याच भारतीय विकेटकीपरला अशी कामगिरी करता आली नाही.
तसेच यशस्वी जैस्वाल याने क्रमवारीतील चौथं स्थान कायम राखलं आहे. तर केएल राहुल याने तब्बल 10 स्थानांची झेप घेतली आहे. केएल थेट 30 व्या स्थानावरुन 20 व्या क्रमांकावर येऊन पोहचला आहे.
ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी
इंग्लंडचा ओपनर बेन डकेट यालाही रँकिंगमध्ये फायदा झालाय. डकेटने लीड्समध्ये 62 आणि 149 धावांची खेळी केली. डकेटला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. डकेटने या कामगिरीसह टेस्ट रँकिंगमध्ये 5 स्थानांची झेप घेतली. डकेट यासह आठव्या स्थानी पोहचला आहे.