युतीच्या बदल्यात आर्थिक लाभ? वंचितच्या आरोपाने खळबळ, आनंदराज आंबेडकरांचेही प्रत्युत्तर!
GH News July 17, 2025 08:12 PM

Anandraj Ambedkar : राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक युती घडून आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात युती झाली आहे. एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. या युतीच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र ही युती होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नाते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने मात्र आनंदराज आंबेडकर यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

वंचितने रिपब्लिकन सेनेसोबतचे संबंध तोडले

शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यात युती होताच प्रकाश आंबेडकर प्रमुख असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आनंदराज आंबेडकर यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. तसेच शिंदेंसोबत युती केल्यानंतर आता वंचितने रिपब्लिकन सेनेसोबतचे संबंध तोडले आहेत. शिंदे यांच्या हातचे बाहुले बाणण्यात वैयक्तिक आणि आर्थिक फायदा मिळाला का? असा सवाल वंचितने आनंदराज आंबेडकर यांना केला आहे.

वंचितने केलेले आरोप काय?

रिपब्लिकन सेनेच भाजाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती केली आहे. ही युती फक्त संविधान वाचवण्यासाठीच्या लढाईविरुद्धच नाही, तर ही युती फुले साहू आंबेडकरांच्या विचारसरणीच्याही विरोधात आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या निर्णयामुळे आम्हाला फक्त निराशाच झालेली नाही तर हे वेदनादायक आहे. आम्ही विचार करतोय की, आनंदराज आंबेडकर यांनी सत्तेसाठी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी युती केली आहे की? यातून भाजपा आणि आरएसएसच्या अजेंड्याला लपवण्यासाठी ही युती करण्यात आली आहे? कोणाच्यातरी हातचे बाहुले बनून एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, विशेषत: बौद्ध आणि मुस्लिमांविरूद्धच्या आरएसएसच्या गुन्ह्यांना आणि अजेंड्यांना पाठीशी घालण्यासाठी ही युती करण्यात आलीय का?  हातचे बहुले बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आणि आर्थिक फायदा मिळालाय का? असा सवालही वंचितने आनंदराज आंबेडकर यांना केला आहे.

वंचितने सगळा इतिहास समोर आणला

तसेच आम्ही यापूर्वीच्या निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला होता. आनंदराज आंबेडकर यांच्या विनंतीवरून आम्ही रिपब्लिकन सेनेला सामावून घेतले. आम्ही 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीतही हे सौजन्य दाखवले. आमच्याच पाठिंब्याने आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, असा सगळा इतिहासाच वंचितीने यावेळी मांडला.

…अशा विचारांच्या लोकांना आमच्याकडे जागा नाही

आता हे सौजन्य संपत आहे. वंचित बहुजन आघाडी मत-मतांतरं सामावून घेऊ शकते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आणि आरएसएस-भाजपाच्या हातचे बहुले झालेल्या लोकांच्या विचारांच्या लोकांना आमच्याकडे जागा नाही, असेही वंचितने सुनावले आहे.

आनंदराज आंबेडकर यांनी केला पलटवार

वंचितच्या या आरोपांना आनंदराज आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे. मला जे मला कार्यकर्ते ओळखतात त्यांना माहिती आहे की, आजपर्यंत माझं काम हेच माझं बोलणं आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे की या अशा गोष्टीनां मी फार किंमत देत नाही. मी स्वतः आर्थिक सक्षम आहे. अशा फालतू आरोपांवर आंबेडकरी जनता विश्वास ठेवणार नाही.

वंचितचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येण्यास तयार

कार्यकर्त्यांना कुठेतरी सत्तेच्या परिघामध्ये आणण्यासाठी ही युती करण्यात आली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकत्यांनी सत्तेत बसावे हाच आमचा प्रयत्न आहे. भाजप आणि आरएसएसचा जो अजेंडा आहे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. जो कोणी संविधाना हात लावेल तेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे जे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यावर लोकांचा विश्वास नाही. माझ्याशी प्रत्येक जिल्ह्यामधल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधलेला आहे. आज अनेक लोक रिपब्लिकन सेनेमध्ये येण्यासाठी तयार आहेत, असेही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.