POKमध्ये उघडपणे फिरताना दिसला मोस्ट वांटेड दहशतवादी मसूद अजहर? पाकिस्तान भारताकडे सोपवणार का?
GH News July 19, 2025 12:08 PM

Masood Azhar Spotted: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील नेते बिलावल भुट्टो यांनी दिले होते. मसूद अझहर पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु मसूद अझहर हा पाकिस्तानातच आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. मसूद अझहर हा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात लपला आहे. हे ठिकाण त्याच्या जुन्या बालेकिल्ल्या बहावलपूरपासून सुमारे १००० किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता आणखी वाढली आहे.

बिलावल भुट्टो काय म्हणाले होते?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मसूद अझहर गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दूच्या सदपारा रोड परिसरात दिसला. या भागात दोन मशिदी, मदरसे आणि अनेक खाजगी आणि सरकारी अतिथीगृहे आहेत. काही दिवसांपूर्वी बिलावल भुट्टो यांनी मसूद अझहर अफगाणिस्तानात असू शकतो, असे एका मुलाखतीत म्हटले होते. त्याच्यासंदर्भात भारत सरकारला माहिती असेल तर ती आम्हाला द्यावी. आम्ही त्याला अटक करण्यास तयार आहोत. परंतु मसूद अझहरसंदर्भात आता जी माहिती मिळाली आहे, ती पाकिस्तानच्या मसूद अझहरच्या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित करणारी आहे.

जैश ए मोहम्मदकडून दिशाभूलचा प्रयत्न

जैश-ए-मोहम्मदच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मसूद अझहरचे जुने ऑडिओ संदेश पुन्हा चालवले जात आहे. तो अजूनही बहावलपूरमध्ये आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु गुप्तचर सूत्रांनी हे दावे दिशाभूल करणारे मानले आहेत. तो गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रदेश सामरिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर येथून जातो. या परिस्थितीत मसूद अझहरचे या ठिकाणी असणे हे या प्रदेशाला अधिक अस्थिर बनवू शकतो.

काय असणार रणनीती?

मसूद अझहर पाकिस्तानात असल्याची पुष्टी झाली तर ते पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी दाव्यांचा पर्दाफाश करू शकते. भारताने आधीच अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानला मसूद अझहरला भारताकडे सोपवण्याची मागणी केली आहे. आता या नवीन ठिकाणाच्या खुलाशानंतर पाकिस्तानवरील दबाव आणखी वाढू शकतो. भारतीय गुप्तचर संस्था त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष्य ठेवणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.