राज्याचे गृहारज्यमंत्री योगेश कदमय यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावाने कांदिवलीत डान्स बार आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधिमंडळात केला. या आरोपानंतर आता वातावरण चांगलेच तापले आहे. दम्यान, परब यांच्या आरोपानंतर आता रामदास कदम यांनी पुढे येत परबांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच परब यांनी विधिमंडळाची दिशाभूल केली आहे. चुकीचे नियम सांगून त्यांनी योगेश कदम तसेच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या जादूटोण्याच्या आरोपालाही कदमांनी उत्तर दिलंय.
अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. आपल्या मालकाला म्हणजेच, उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हे केलं जातंय. रामदास कदम यांना कुठं बदमान करता येतं का? हा बालीश प्रयत्न विधिमंडळाचा आधार घेऊन चालू आहे. विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे. हे विधिंमडळ नियमाने चालतं. काल (18 जुलै) यांनी अनिल परब यांनी सभागृहाची दिशाभूल केली. सभागृहाला चुकीची माहिती दिली. त्यांनी चुकीचे नियम दाखवले. त्यामुळे योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणारे पत्र मी विधानसभा अध्यक्षांना देणार आहे, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.
तसेच, सावली हा बार 1990 सालापासून चालू आहे. हा बार माझा पत्नीच्या नावेच आहे. व्यवसाय करण्यासाठी कोणाचीही कसलीच अडचण नाही. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही हा बार शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला आहे. मला वाटतं 30 वर्षांमध्ये आम्ही तिथे पायही ठेवला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
त्या बारमध्ये 14 महिलांची वेटर म्हणून परवानगी आहे. तसेच तेथे ऑर्केस्ट्राचीही परवानगी आहे. तिथे डान्स बार चालत नाही. अनिल परब यांनी सावली हा डान्स बार आहे, असे सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.
पोलिसांनी त्या बारच्या ठिकाणी पाहणी केली होती. त्या वेळी एका गिऱ्हाईकाने एका लेडीज वेटरवर पैशांची उधळण केली असे मला समजत आहे. म्हणूनच आम्ही ताबडतोड त्या शेट्टीला आम्ही बाहेर काढले. त्या शेट्टीवर कारवाई केली. लेडिज वेटरचं लायसन्स होतं ते रद्द केलं. आम्ही ऑर्केस्ट्राचा परवानाही रद्द केला. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही ते हॉटेलही बंद केलं आहे, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली. तसेच माझ्या पत्नीला बदनाम करण्याचं काम केलं जातंय. त्याविरोधात मी कारवाई करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
रामदास कदम यांच्या पत्नीला अडचणीत टाकायचं असेल तर तुम्हाला नियमांत बदल करावा लागेल. आपण नियमाने चालणार आहोत की आपण नियमबाह्य काम करणार आहोत, हे ठरवावे लागेल. अनिल परब यांनी चुकीच्या नियमाचा आधार घेऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच रामदार कदम यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोपही रामदास कदम यांनी केला.
शिंदे गटाला 50 जागा मिळाल्या. हा जादुटोणा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती. त्यावर बोलताना ज्यांना काविळ होतो, त्यांना सगळे पिवळेच दिसते. ते मातोश्रीवर बसून जादुटोणाच करत असतील तर त्यांना सगळीकडे जादूच दिसेल. ते जेव्हा वर्षा बंगला सोडून गेले तेव्हा तिथे टोपलीभर लिंबं मिळाली. ते स्वत: जादूटोणाच करत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत, असा पलटावर रामदास कदम यांनी केला.