मँचेस्टर कसोटीत एकाच दिवसात दोन वेळा टीम इंडिया ऑलआऊट, वेगवाने गोलंदाजाने घेतले होते 9 विकेट
GH News July 19, 2025 09:14 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना भारताला काही मालिका वाचवण्यासाठी काहीही करून जिंकावा लागणार आहे. पण मँचेस्टरचं मैदान भारतीय संघासाठी कधीच लाभलं नाही. आतापर्यंत या मैदानात भारताने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 9 कसोटी सामन्यापैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर पाच सामने ड्रॉ झाले आहेत. या मैदानावर भारताला पहिल्यांदा 73 वर्षांपूर्वी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा इंग्लंडच्या एका गोलंदाजाने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवून दिली होती. हा सामना 17 जुलै 1952 रोजी झाला होता. या सामन्यात भारतीय संघाची पार वाट लागली होती. भारतीय संघाचा या मैदानावर तिसरा आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय संघाचा हा पहिला कसोटी सामना होता. 17 जुलैला सुरु झालेला सामना 19 जुलैला संपला. पावसामुळे इंग्लंडने या मैदानात दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटिंग केली होती आणि पहिल्या डावात 347 धावा करून डाव घोषित केला होता.

तिसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जुलैला टीम इंडियाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या सामन्यात वेगवान गोलंदाज फ्रेड ट्रूमॅनने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज ट्रूमॅनन तेव्हा फक्त 21 वर्षांचा होता. संघात नव्यानेच आला होता. पण त्याने या मालिकेतील दोन सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने एकट्याने भारताच्या 8 फलंदाजांना तंबूत पाठवलं. पहिल्या डावात भारताचा डाव 58 धावांवर आटोपला आणि फॉलोऑनची नामुष्की ओढावली.

पहिल्या डावातील धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय दुसऱ्यांदा फलंदाजीला उतरला. या डावातही भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या डावात ट्रूमॅनला फक्त एक विकेट मिळाली. पण एलेक बेडसरने 5 आणि टोनी लॉकने 4 विकेट घेतल्या. या दोघांनी मिळून भारताचा दुसरा डावा 82 धावांवर संपवला. त्यामुळे भारताचे दोन्ही डाव एका दिवसात संपले. भारताने 20 विकेट गमवून 140 धावा केल्या. यासह इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 207 धावांनी जिंकला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.