कसोटी क्रिकेट हा पाच दिवसांचा खेळ असतो. प्रत्येक दिवशी 90 षटकांचा खेळ होतो. या दरम्यान खेळाडूंची कसोटी लागते. सामन्यादरम्यान खेळाडूंना त्यांची ऊर्जा आणि एकाग्रता टिकवून ठेवणं भाग असतं. यासाठी योग्य अन्न आणि पेय घेणं खूपच महत्त्वाचं असतं. कसोटी सामन्यात दोन ब्रेक होतात. एक लंच ब्रेक आणि दुसरा टी ब्रेक.. या काळात खेळाडू काय खातात याबाबत आश्चर्य असतं. कारण त्यांना पुन्हा मैदानात उतरून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायचं असतं. अशा स्थितीत त्याबाबत कुतुहूल असणं सहाजिकच आहे. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज ओली पोपने याबाबत एक खुलासा केला आहे. खेळाडू ब्रेक दरम्यान काय खातात आणि काय पितात याबाबत सांगितलं आहे.
कसोटी सामन्यादरम्यान जेवणासाठी म्हणजेच लंच ब्रेक हा 40 मिनिटांचा असतो. या काळात खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये जातात. ओली पोपच्या मते खेळाडू यावेळी जेवणात सामान्यतः चिकन, मासे किंवा पास्तासह स्टेक घेतात. यामुळे त्यांना आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. पण जेव्हा फलंदाज क्रीजवर फलंदाजी करत असतो तेव्हा परिस्थिती वेगळी असते. अशा स्थितीत आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. कारण क्रिजवर असताना पूर्ण जेवण खाल्ल्याने थकवा येऊ शकतो. गोलंदाजांना गोलंदाजी सत्रानंतर लवकर ऊर्जा परत मिळवण्यासाठी हलके, पोषक तत्वांनी भरलेले जेवण देखील आवडते.
क्रिकेट संघांकडे खास पोषणतज्ञ असतात. ते खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि गरजांनुसार जेवणाचे नियोजन करतात. दुपारच्या जेवणाच्या मेनूमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले निरोगी अन्न असते. त्यात भात, डाळ, भाज्या, चिकन, मासे, रोटी, सॅलड, फळे आणि एनर्जी ड्रिंक्स यांचा समावेश असतो.”जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा मी जास्त खात नाही.फक्त हलके जेवण खातो, जसे की फक्त प्रोटीन शेक आणि केळी.”, असं ओली पोपने सांगितलं. नंतर दिवसाच्या शेवटी पूर्ण जेवण घेतो, असंही त्याने पुढे सांगितलं.
दुपार ते संध्याकाळ दरम्यान 20 मिनिटांचा टी ब्रेक असतो. काळात खेळाडू डिहायड्रेशनपासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पोप म्हणाला की चहा ब्रेक म्हणजे नेहमीच चहा पिणे असे नाही. “काही लोकांना चहा आवडतो. मी सहसा कॉफी पितो. कधीकधी पावसामुळे खेळ थांबल्यावर मी चहा पितो.” भारतीय उपखंडात, जिथे हवामान उष्ण आणि दमट आहे. या ठिकाणी खेळाडू डिहायड्रेशन टाळण्यासाठी इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स, पॉवर ड्रिंक्स आणि नारळ पाण्याचे सेवन करतात.