‘हा’ देश एक लाख लोकांची हत्या करणार? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
GH News July 19, 2025 11:09 PM

जागतिक स्तरावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनच्या निष्काळजीपणामुळे 1 लाखाहून अधिक अफगाण नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश सरकारने ब्रिटीश सैन्य आणि गुप्तचर संस्थांसाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांची गुप्त यादी गमावली आहे. आता ही यादी तालिबानच्या हाती पडण्याची भीती आहे. असे झाल्यास 1 लाखापेक्षा जास्त लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. हे तीन लोक ब्रिटनशी जोडलेले होते. त्यामुळे आता आगामी काळात ब्रिटनशी जवळीक असलेल्या इतरही लोकांची हत्या होण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डेटा लॅप्स आहे, ज्यामुळे सुमारे 1 लाख लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटनसाठी काम करणाऱ्या लोकांची यादी तालिबानपर्यंत पोहोचली की नाही हे स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनशी जवळीक असणाऱ्या लोकांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे ही यादी पोहोचली असल्याचा संशय वाढला आहे. अलिकडेच एक अफगाणी सैनिक ब्रिटनला पळून गेला आहे. त्याने सांगितले की, मी ब्रिटनसोबत काम करत असल्याने माझ्या भावाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे तालिबानकडे संपूर्ण यादी पोहोचली असेल तर आगामी काळात हत्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत बऱ्याच लोकांची हत्या

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अनेक लोकांची हत्या करण्यात आली आहे. यात ब्रिटनच्या अफगाण पुनर्वसन योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांचा समावेश आहे. ब्रिटिश सैन्यासोबत काम करणारे कर्नल शफीर अहमद खान यांची 2022 मध्ये हत्या करण्यात आली होती. तसेच 2023 मध्ये कमांडो अहमदझाई आणि सैनिक कासिम यांची हत्या करण्यात आली होती.

ब्रिटनचे गुप्त ऑपरेशन

ब्रिटनने यादीतील संभाव्य लोकांना ब्रिटनमध्ये आणण्यासाठी ऑपरेशन रुबिफिक नावाचे ऑपरेशन केले होते. याअंतर्गत ऑगस्ट 2023 पासून 18500 अफगाणी लोकांना ब्रिटनमध्ये आणले आहे. तसेच आणखी 23900 लोकांना ब्रिटनमध्ये आणण्याची योजना आहे अशी माहिती समोर आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.