शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय कसोटी संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा असा आहे. इंग्लंडला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर भारताला मालिकेत कायम राहण्यासाठी हा चौथा सामना जिंकणं बंधनकारक आहे.
या सामन्यात इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रुट याला एका झटक्यात अनेक माजी फलंदाजांना पछाडण्याची संधी आहे. रुटकडे राहुल द्रविड, जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग या त्रिकुटाला पछाडत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण दुसरा फलंदाज होण्याची संधी आहे. सर्वाधिक कसोटी धावांचा विश्व विक्रम हा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.
जो रुट याने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीतील 156 सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. रुटने या दरम्यान काही सामन्यांत इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. रुटने 156 कसोटी सामन्यांमध्ये 50.8 च्या सरासरीने 13 हजार 259 धावा केल्या आहेत. जो रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय पहिला तर एकूण पाचवा फलंदाज आहे.
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड चौथ्या स्थानी आहे. द्रविडने 164 कसोटींमध्ये 13 हजार 228 धावा केल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज ऑलराउंडर जॅक कॅलिस याने 166 कसोटींमध्ये 13 हजार 279 धावा केल्या आहेत. द्रविड आणि रुट यांच्यात फक्त 29 धावांचंच अंतर आहे. तर कॅलिस आणि रुट यांच्यातील धावांचा फरक हा 30 इतकाच आहे.
तसेच या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंग दुसर्या स्थानी आहे. पॉन्टिंगने 168 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 378 धावा केल्या आहेत. पॉन्टिंगला पछाडण्यासाठी जो रुट याला 120 धावांची गरज आहे.
सचिनने 200 सामन्यांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15 हजार 921 धावा केल्या आहेत. रुटला चौथ्या कसोटीत रिकी पॉन्टिंगला पछाडण्यासाठी 120 धावांची गरज आहे. त्यानंतर रुट आणि सचिन यांच्यातील धावांचा फरक हा फक्त 2 हजार 542 इतकाच राहिल. मात्र रुटचं आधी या तिघांना पछाडून दुसऱ्या स्थानी पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान जो रुट याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील 3 सामन्यांमध्ये 50.60 च्या सरासरीने 253 धावा केल्या आहेत. रुटने या दरम्यान 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे.