भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाला लीड्सनंतर लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी हा चौथा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.
टीम इंडियाला मालिकेत कायम राहण्यासाठी कोणत्याही स्थितीत मँचेस्टरमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत या मैदानात एकदाही विजय मिळवता आलेला नाही. तसेच इंग्लंडला या मैदानात गेल्या 6 वर्षांत कोणताही संघ पराभूत करु शकलेला नाही. त्यामुळे भारताचा या सामन्यात चांगलाच कस लागणार असल्याचं स्पष्ट आहे.
मँचेस्टरमध्ये होणाऱ्या या सामन्यात एक खास नजारा पाहायला मिळणार आहे. या मैदानात भारताचे 1,2 नाही तर तब्बल 10 खेळाडू पदार्पण करणार आहेत.
ओल्ट ट्रॅफर्ड स्टेडियम खेळपट्टीसाठी प्रसिद्ध आहे. ही खेळपट्टी भारतासाठी आव्हानात्मक ठरु शकते. भारतीय संघातील रवींद्र जडेजा हा एकमेव असा खेळाडू आहे जो या मैदानात कसोटी सामना खेळला आहे. मात्र त्या व्यतिरिक्त सध्याच्या संघातील एकाही भारतीयाने या मैदानात कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजा व्यतिरिक्त उर्वरित 10 खेळाडूंचं या मैदानात चौथ्या सामन्यातून पदार्पण होणार आहे.
टीम इंडियाने चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल न केल्यास यशस्वी यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील पहिलाच सामना ठरेल.
टीम इंडियाला ओल्ट ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये एकदाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नाही. भारताने या ऐतिहासिक स्टेडियममध्ये एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी 4 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने या स्टेडियममध्ये 1936 साली पहिला कसोटी सामना खेळला होता. तर टीम इंडियाने या मैदानात शेवटचा सामना हा 2014 साली खेळला होता. तेव्हा इंग्लंडने भारतावर डाव आणि 54 धावांनी मात केली होती.