मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटण्यासाठी तर हॉटेलमध्ये एकत्र आले तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलमध्ये आले होते, तसेच या दोघांमध्ये भेट झाली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हॉटेलमधून बाहेर पडताना आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं
आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमध्ये बाहेर पडताना सविस्तर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला सांगितले की, मी माझ्या मित्रांसोबत डिनरसाठी आणि एक संगीत कार्यक्रम होता त्यासाठी आलो होतो. मी कार्यक्रमात असतानाही या बातम्या पाहत होतो. या बातम्या पाहून एक व्यक्ती आता गावाला जाईल असं वाटतय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या विधानाचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे होता. जेव्हा-जेव्हा एकनाथ शिंदे नाराज असतात तेव्हा ते गावाला जातात अशी टीका ठाकरे गटाकडून वारंवार केली जाते. त्यामुळे आताही आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत बोलताना म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हॉटेल मध्ये गेल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात. मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्या दोघांची भेट योगायोगाने झाली. दोन्ही नेते समोरासमोर आले तर महाराष्ट्राची संस्कृती आहे की अभिवादन करणं नमस्कार करणं, हे फार स्वभाविक आहे. लगेचच सुतावरून स्वर्ग गाठणे हे योग्य नाही.
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिली होती ऑफर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. ‘उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.’