WLC 2025 : भारतीय खेळाडूची पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून माघार, जोरदार विरोधानंतर निर्णय
GH News July 20, 2025 02:07 AM

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला 18 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 7 संघातील माजी खेळाडू एकमेकांसमोर भिडणार आहेत. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने इंग्लंड चॅम्पियन्सवर मात करत विजयी सलामी दिली. मात्र या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे 20 जुलैला होणाऱ्या सामन्याकडे आहे. इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सामन्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र दुसर्‍या बाजूला या सामन्याला भारतीयांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या तीव्र विरोधानंतर भारताच्या माजी खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.

पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह याने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे. हरभजन या स्पर्धेतील पहिल्या पर्वातही सहभागी झाला होता. मात्र पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला वाढता विरोध पाहता हरभजनने माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.

तसेच हरभजन व्यतिरिक्त या सामन्यातून इरफान आणि युसूफ या पठाण बंधुंनीही माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतावादी हल्ल्यात भारतातील अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचे अनेक व्यवहार बंद करत आर्थिक कोंडी केली. मात्र या दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याच्या आयोजनामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच खेळाडूंनीही कोणताही विरोध न दर्शवता सहभाग घेतल्याने चाहत्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. त्यानंतर वाढता विरोध पाहता भारताच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सामनाच रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गौतम गंभीरच्या कोचकडून संताप

दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर यांच्या बालपणीचे कोच संजय भारद्वाज यांनी पाकिस्तान विरूद्धच्या या सामन्यात सहभाग घेण्यावरुन खेळाडूंवर संताप व्यक्त केला. “यांना फक्त पैसा हवाय”, अशा शब्दात भारद्वाज यांनी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची कानउघडणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.