>> डॉ. सुनिलकुमार सारानाक
पाऊस हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आस्थेचा विषय आहे, पाऊस पडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱयाची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशा वेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की, त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे यालाच कृत्रिम पाऊस म्हणतात.
कृत्रिम पाऊस हा विषय अलीकडे खूप चर्चेत आहे. मात्र बरेच जण त्याबाबतीत अनभिज्ञ आहेत. खरं तर हा विषय तांत्रिक स्वरूपाचा आहे . थोडासा किचकटही आहे. मात्र हा विषय आपल्या शेतीप्रधान देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तो माहीत असणे आवश्यक आहे. हे ओळखूनच प्रा.चंद्रसेन टिळेकर यांनी ‘कृत्रिम पाऊस’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. पाऊस अत्यंत कमी पडला किंवा पडलाच नाही तर दुष्काळासारखा कठीण प्रसंग ओढवू नये म्हणून शास्त्रज्ञांनी आकाशातल्या ढगातले पाणी आपल्याला हवे असेल तेव्हा जमिनीवर केव्हा पडावे यादृष्टीने प्रयोग केले आणि त्यातून जन्म झाला तो या ‘कृत्रिम पाऊस’ या तंत्राचा.
अनेकदा आकाशात ढग जमा होऊनही त्यांच्यातून पाऊस पडत नाही तेव्हा आपल्याला वर आकाशात जाऊन त्यांना गदागदा हलवून त्यांच्यातले पाणी खाली पाडावेसे वाटते. शास्त्रज्ञ अशा वेळी वर आकाशात विमान पाठवून त्यांच्या सहाय्याने ढगांवर विशिष्ट पदार्थांचा मारा करतात, जेणेकरून जगातील जलबिंदूंचा आकार मोठा होऊन ते खाली जमिनीवर पडतात आणि पाऊस पडतो. यालाच आपण कृत्रिम पाऊस म्हणतो. यासाठी अर्थातच अद्ययावत अशा साधनांची, उपकरणांची गरज भासते. अशा महत्त्वाच्या उपकरणांची माहितीही या पुस्तकात दिली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात सर्वप्रथम कोणत्या देशांनी प्रयत्न केले व त्यांनी त्यांना आलेल्या अडचणींवर कशी मात केली, तेही विषद केले आहे. विषय नीट समजावा म्हणून या पुस्तकात असंख्य चित्रे व आलेख दिलेले आहेत हे विशेष!
कृत्रिम पाऊस
लेखक ः प्रा.चंद्रसेन टिळेकर
प्रकाशक: दिलरप राज प्रकाशन तरतूदी.
पृष्ठे ः 124,
किंमत: रु. 180/-