इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी चौथा सामना हा अतिशय अटीतटीचा पर्यायाने करो या मरो असा आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान आहे. त्याआधी टीम इंडियात 2 सामन्यांसाठी 24 वर्षीय युवा खेळाडूचा उर्वरित 2 सामन्यांसाठी समावेश करण्यात आला आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नाही.
अंशुल कंबोज याचा उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला झालेल्या दुखापतीमुळे अंशुलला भारतीय संघात बॅकअप म्हणून संधी दिली गेली आहे. अर्शदीपला दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अर्शदीपला खोलवर जखम झाली आहे. त्यामुळे टाके मारण्यात आले आहेत. अर्शदीपला डॉक्टरांनी 10 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अर्शदीपच्या जागी अंशुलला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंशुल इंग्लंड दौऱ्यात इंडिया ए टीमचा भाग होता. अंशुलने जून महिन्यात 3 दिवसीय सामना खेळला होता. अंशुलने धारदार बॉलिंगने क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केलं होतं. अंशुलने 2 सामन्यांमध्ये 131 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अंशुलने 2 सामन्यांमध्ये 76 धावाही केल्या होत्या. त्यामुळे अंशुलला भारताच्या मुख्य संघात संधी देण्यात यावी, अशा चर्चा सुरु होती. तेव्हा अंशुलला संधी मिळाली नाही. मात्र अखेर आता अंशुलचा समावेश करण्यात आला आहे.
अर्शदीपला नेट्स प्रॅक्टीसदरम्यान साई सुदर्शने मारलेला फटका रोखताना दुखापत झाली. हाताला जास्त प्रमाणात मार लागल्याने अर्शदीपला चौथ्या कसोटी सामन्याला मुकावं लागू शकतं. तसेच आकाश दीप हा देखील खेळू शकणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. आकाशला ग्रोइन इंजरीमुळे मुकावं लागू शकतं.
दरम्यान वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतील 5 पैकी 3 सामन्यांतच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. त्यामुळे बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की पाचव्या असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मात्र बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.