Eknath Shinde : मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. यावरच बोलताना एकनाथ शिंदे यांनी मला लाडक्या बहिणींची मुलं लाडका मामा बोलतात, असं म्हटलंय. एकनाथ शिंदे मुंबईतील अंधेरीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण कधीच बंद होणार नाही, असंही सांगितलं. तसेच विरोधकांची पोटदुखी कमी करण्यासाठी आम्ही आपला दवाखानाही चालू केला असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लाडक्या बहिणींची मुले मला आता लाडका मामा बोलतात. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रात, मुंबईत विकासाची गंगा आणली. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींसाठीची योजना कायम असेल. शेतकऱ्यांसाठी केलेली योजनाही असेल, ज्येष्ठांसाठी केलेली योजनाही असेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आणलेल्या योजनाही असतील. लेक लाडकी लखपती योजनादेखील बंद होणार नाही. महिलांनी एसटीने प्रवास करताना तिकिटात पन्नास टक्के सवलत दिली जाते. ही योजनादेखील बंद होणार नाही, असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आम्ही टप्प्याटप्प्याने या योजना पूर्ण करू. आमचे सरकार हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, असे म्हणणारे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नसला तरी महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत. निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप करायचे, टीका करायची. मुंबई, मराठी माणूस, मुंबईकर यावर बोलायचं, असे प्रकार चालू आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मुंबईतले सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय घेतला. सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी दुरुस्तीच्या कामात फक्त काळ्याचं पांढरं केलं जायचं. आता त्यांची दुकाने बंद झाली आहेत. म्हणूनच त्यांना पोटदुखी होत आहे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही. यामुळे सर्वांना पोटदुखी झाली. म्हणून रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या आरोपाला एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर देत नाही. मी त्यांना कामातून उत्तर देतो. त्यांची पोटदुखी बरी करायला आम्ही आपला दवाखाना सुरू केला, अशी फटकेबाजीही शिंदे यांनी आपल्या भाषणात केली.
आपलं स्थगिती सरकार नाही. आपलं प्रगती सरकार आहे. समृद्धी सरकार आहे. लोकांची समृद्धी हाच आपला अजेंडा आहे. काही लोक म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. प्रत्येक निवडणुकीवेळी त्यांचा हाच प्रयत्न असतो. लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करत मुंबई महाराष्ट्रातून कधीही वेगळी होऊ शकत नाही, असा ठोसपणे सांगितलं.