ENG vs IND : केएल मँचेस्टरमध्ये मोठ्या विक्रमासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध खास कामगिरीची संधी
GH News July 20, 2025 10:13 PM

भारतीय कसोटी संघातील सर्वात अनुभवी फलंदाज केएल राहुल याने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत चमकदार कामगिरी केली आहे. केएल या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतासाठी मालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला चौथ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवणं भाग आहे. तसेच या सामन्यात केएल राहुलला काही कीर्तीमान करण्याची संधी आहे. केएलला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी फक्त 60 धावांचीच गरज आहे. तसेच केएलला या सामन्यात इंग्लंडमध्ये 1 हजार कसोटी धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. केएल इंग्लंडमध्ये 1 हजार धावा करण्यापासून 11 धावा दूर आहे.

केएल मँचेस्टरमध्ये 9 हजार धावा करण्यासाठी सज्ज

केएलने आतापर्यंत भारताचं कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही प्रकारात मिळून एकूण 218 सामने खेळले आहेत. केएलने या दरम्यान 39.73 च्या सरासरीने 8 हजार 940 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 19 शतकं आणि 58 अर्धशतकं झळकावली आहेत. केएलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावांसाठी फक्त 60 धावांचीच गरज आहे. त्यामुळे केएलचा मँचेस्टरमध्ये हा खास कीर्तीमान करण्याचा प्रयत्न असणार आहे.

केएलची इंग्लंडमधील कामगिरी

केएलने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. केएलने या 12 सामन्यांमध्ये 41.20 च्या सरासरीने 989 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 4 शतकं आणि 2 अर्धशतक झळकावली आहेत. केएलची 149 धावा ही इंग्लंडमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. केएलने मँचेस्टरमध्ये 11 धावा केल्यास त्याच्या इंग्लंडमध्ये 1 हजार कसोटी धावा पूर्ण होतील.

तसेच केएलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील 3 सामन्यांमधील 6 डावांत 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत. केएलने या मालिकेत 2 शतकं आणि 1 अर्धशतक ठोकलं आहे.

केएल राहुल याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

केएलने आतापर्यंत 61 कसोटी सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 3 हजार 632 धावा केल्या आहेत. तसेच केएलने वनडे क्रिकेटमध्ये 85 सामन्यांत 49.08 च्या सरासरीने 3 हजार 43 धावा केल्या आहेत. केएलने टी20i फॉर्मेटमध्येही फटकेबाजी केलीय. केएलने 72 सामन्यांमध्ये 2 हजार 265 धावा कुटल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.