जय शाह यांचा बीसीसीआयला झटका, आगामी 3 WTC Final बाबत मोठा निर्णय
GH News July 21, 2025 12:08 AM

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली आहे. या स्पर्धेच्या आगामी 3 साखळीतील अंतिम सामन्यांचं ठिकाण जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीची सिंगापूरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत निर्णय झाला. आयसीसीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. त्यानुसार एकाच देशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या 3 साखळीतील अंतिम सामने आयोजित केले जाणार आहेत.

आयसीसीची Wtc फायनलबाबत मोठी घोषणा

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील चौथ्या साखळीचा (wtc 2025-2027) थरार सुरु आहे. आयसीसीने आगामी 2027, 2029 आणि 2031 या तिन्ही साखळीतील अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान इंग्लंडला दिला आहे. हा निर्णय कसोटी क्रिकेटचा थरार आणखी वाढावा या हेतून घेतल्याचं म्हटलं जात आहे. तसेच आयसीसीने तिन्ही साखळ्यांच्या अंतिम सामन्याचं यजमानपद इंग्लंडला देण्यामागे कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

तिन्ही अंतिम सामने इंग्लंडमध्येच

क्रिकेटला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. आतापर्यंतच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील 3 साखळीतील अंतिम सामने इंग्लंडमध्येच खेळवण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या साखळीतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारत आमनेसामने होते. न्यूझीलंडने wtc 2019-2021 या पहिल्या साखळीतील महाअंतिम सामन्यात साऊथम्पटनमध्ये भारतावर मात केली होती. त्यानतंर 2021-2023 या साखळीतील अंतिम सामना ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर तिसऱ्या साखळीतील महाअंतिम सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये पार पडला.

आयसीसीकडून माहिती काय?

“इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाला ट्रॅक रेकॉर्ड पाहता आगामी 2027, 2029 आणि 2031 या तिन्ही साखळीतील महाअंतिम सामन्यासाठीचं यजमानपद देण्यात आलं आहे”, असा उल्लेख आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला 2019 पासून सुरुवात

दरम्यान कसोटीतील वर्ल्ड कप स्पर्धेला 2019 पासून सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटमधील थरार आणि रोमांच आणखी वाढावा या उद्देशाने 2019 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून भारताने सलग 2 वेळा अंतिम फेरीत धडक दिली. मात्र न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. तर यंदा 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने या ट्रॉफीवर आपलं नाव कोरत गतविजेता ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.