मोठी बातमी! छावा कार्यकर्ता मारहाण प्रकरण तापलं, नांदेडमध्ये टायर जाळून आंदोलन
GH News July 21, 2025 01:13 AM

लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते फेकून माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळाबाबत जाब विचारला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. आता या घटनेचे प्रसाद नांदेडमध्ये सुद्धा उमटत आहेत.

नांदेडमध्ये मराठा चळवतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत रहदारीचे ठिकाण असलेल्या जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स समोर चक्क रस्त्याच्या मधोमध टायर जाळून आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यात्रा जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत बोलताना दशरथ कपाटे यांनी म्हटले की, ‘अजित दादांचा पक्ष हा सत्तेच्या मस्तीचा पक्ष आहे. शेतकरी नेते विजय घाडगे यांनी कृषी मंत्र्याचा व्हिडिओ सुनील तटकरे यांना दाखवून असा जर कृषिमंत्री असेल तर राज्यात शेतकऱ्यांच काय बोलणार आहे असा जबाब विचारला. तेव्हा सुरज चव्हाण यांनी गुंड बोलवून त्यांना मारहाण केली आहे. आता शेतकरी आणि मराठा समाज तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.

नेमकं काय घडलं होतं?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी हा गेम खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलंय. सुनील तटकरे यांनाही लातूरमध्येही अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले. छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने टेबलवर पत्ते टाकले आणि कृषीमंत्र्यांना हे द्या असं म्हटलं होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळही केली.

चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही – तटकरे

राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. यावरच तटकरे यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘या मारहाणीत सूरज चव्हाण असतील तर ते चूक आहे. मी याचं कधीच समर्थन करणार नाही, योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मी आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. छावा पदाधिकाऱ्याला मारहाण झाली ही चूक घडली. मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.