बांगलादेश क्रिकेट टीमने विजयी झंझावात कायम राखत श्रीलंकेनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजत टी 20i क्रिकेटमध्ये विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील शेवटचे 2 सामने जिंकले. बांगलादेशने यासह ही मालिका जिंकली. त्यानंतर आता बांगलादेशने मायदेशात टी 20i मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने बांगलादेशसमोर 110 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 27 बॉलआधी 7 विकेट्स राखून पूर्ण केलं. बांगलादेशने 15.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 112 धावा केल्या. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.
बांगलादेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कर्णधार लिटन दास याचा निर्णय बांगलादेशच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. गोलंदाजांनी पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. बांगलादेशने पाकिस्तानला 19.3 ओव्हरमध्ये 109 धावांवर गुंडाळलं.
पाकिस्तानसाठी फखर झमान, अब्बास अफ्रीदी आणि खुशदील या तिघांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. फखरने सर्वाधिक 44 धावा केल्या. अब्बासने 22 तर खुशदिलने 17 रन्स केल्या. या व्यतिरिक्त इतर सर्वांनी बांगलादेशसमोर गुडघे टेकले. बांगलादेशसाठी तास्किन अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मुस्तफिजुरने दोघांना आऊट केलं. तर मेहदी हसन आणि तांझिम हसन साकिब या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेशची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. तांझिद हसन तमिम आणि कॅप्टन लिटन दास दोघेही प्रत्येकी 1-1 धाव करुन माघारी परतले. त्यानंतर परवेझन एमोन आणि तॉहिद हृदॉय या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तॉहिद 36 धावांवर बाद झाला.
बांगलादेशची विजयी सलामी, पाकिस्तानचा धुव्वा
त्यानंतर परवेझ आणि जाकेर अली या जोडीने बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला. जाकेरने 10 बॉलमध्ये नॉट आऊट 15 रन्स केल्या. तर परवेजने 39 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट आणि सर्वाधिक 56 रन्स केल्या. दरम्यान उभयसंघातील दुसरा सामना हा 22 जुलै रोजी होणार आहे.