ENG vs IND : भारताला मोठा धक्का, ऑलराउंडर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर, कॅप्टन शुबमनला टेन्शन
GH News July 21, 2025 02:07 AM

टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने आधीच पिछाडीवर आहे. उभयसंघात चौथा सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. भारताला मालिकेत कायम राहण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. अशात या आरपारच्या सामन्याआधी टीम इंडिया अडचणीत आहे. उपकर्णधार ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या तिघांना दुखापतीने ग्रासलं आहे. ऋषभ आणि आकाशला तिसऱ्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. तर अर्शदीपला तिसर्‍या सामन्यानंतर सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे टीम इंडियाचा आधीच पाय खोलात गेला आहे. अशात आता भारताच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.

ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापत

भारताचा युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला आता दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. नितीशला या दुखापतीमुळे इंग्लंड विरूद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नितीशला गुडघ्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीशला रविवारी 20 जुलैला जीममध्ये वर्कआऊट करताना दुखापत झाली. त्यानंतर नितीशच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. टेस्टनतंर नितीशच्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं.

नितीशची दुखापत किती गंभीर?

नितीशला झालेली दुखापत किती गंभीर आहे तसेच त्याला किती काळ मैदानाबाहेर रहावं लागेल,हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र नितीशच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

टीम इंडियाला मोठा झटका!

नितीश इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामिगिरी

नितीशने 2024 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण केलं. नितीशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलंवहिलं शतक ठोकत आपली छाप सोडली. मात्र नितीशला इंग्लंड दौऱ्यात काही खास करता आलं नाही. नितीशला दुसऱ्या सामन्यात शार्दूल ठाकुर याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. नितीशने दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावांत प्रत्येकी 1-1 धाव केली. तर एकही विकेट घेता आली नाही. नितीशला त्यानंतरही तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली. नितीशने तिसऱ्या सामन्यात 3 विकेट्स घेण्यासह 30 आणि 13 अशा 43 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.