इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. उभयसंघात 5 पैकी 3 सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. त्यामुळे शुबमनसेनेला मालिकेत कायम रहायचं असेल तर चौथ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तर इंग्लंडकडे या सामन्यासह मालिका विजयाची दुहेरी संधी आहे. या चौथ्या कसोटीतील पाचही दिवस हवामान खराब राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, बुधवारी 23 जुलैला पाऊस होण्याची 25 टक्के शक्यता आहे. तर गुरुवारी 24 जुलैलाही पावसाची शक्यता 25 टक्के इतकीच आहे. शुक्रवारी 25 जुलैला पाऊस होण्याची शक्यता 20 टक्के आहे. शनिवारी 26 जुलैला पाऊस होण्याचा 25 टक्के अंदाज आहे. तर सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस होण्याची सर्वाधिक 58 टक्के शक्यता आहे.
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पोषक आहे. सुरुवातीला इथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र फलंदाजांना सेट झाल्यास मोठी खेळी करण्याची संधी आहे. फिरकी गोलंदाजांना सामन्यातील तिसऱ्या दिवसापासून मदत मिळू शकते. सामन्यातील पाचवा आणि शेवटचा दिवस गोलंदांजासाठी फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळे फलंदाजांची चांगलीच कसोटी लागू शकते.
खेळपट्टी पाहता टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरु शकतो. कारण ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं ठरणार नाही.
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत ओल्ड ट्रॅफर्डमध्ये एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे भारताला या 9 पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने या मैदानातील 9 पैकी 4 सामने गमावले आहेत. तर इंग्लंडने भारताचा या मैदानात 5 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया या मैदानात गेल्या अनेक वर्षांचा इतिहास बदलत चौथ्या सामन्यात विजय मिळवणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.