देशात अघोषीत एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) लागू केला आहे का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. बिहार निवडणुकीतील मतदार याद्यांबाबत आणि ईव्हीएमवरून त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर सरकारव तोफ डागली.
देशात अघोषित एनआरसी?
प्रत्येक राज्याच्या निवडणुका वेळेनुसार होतील. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला. स्वतची ओळख मतदारांनी पटवून द्यायची असं त्यात आहे. म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झाला का. सीए आणि एनआरसी चा विषय पेटला होता. दिल्लीत त्यावर आंदोलन झालं होतं. तुम्ही तुमची ओळख पटवून द्या असं म्हटलं होतं. त्यामुळे वाद झाला होता. आता निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी खडसावलं.
मग ईव्हीएमचे व्हीव्हीपॅट का काढलं?
ईव्हीएम वर आक्षेप असताना व्हीव्हीपॅट काढलं, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अपारदर्शकता आणलं. मग निवडणूक घेता कशाला. यांचे एवढे निवडून आले ते थेट जाहीर करा. आमचं मत आम्हाला कळत नाही. रजिस्टर कुठे होतं हे कळत नाही. बॅलेट पेपरवर मतदान करताना ठसा लावल्यानंतर माझं मत कुठे आहे कळायचं. आता व्हीव्हीपॅट काढलं जात आहे. मग निवडणूक घेताच कशाला, असा अचूक निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.
देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्याची गरज
कोण मित्र आणि कोण दुश्मन हे ठरवलं पाहिजे. मित्र कोणी राहिले नाही. जगात अशी जागा नाही तिथे मोदी गेले नाही. पाकिस्तानसोबत आपला संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानला चीन मदत करत आहे हे उघड झालं आहे. मध्यंतरी चायना बायकॉट केलं होतं. मग आता का जात आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहे. माता भगिनींचं कुंकू पुसलं त्यांचं अमित शाह आणि मोदी काय उत्तर देणार. देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्याची देशाला गरज आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत लगावला. मणिपूर आजही जळत आहे. हे लोक फक्त पक्ष फोडण्यात मश्गूल आहेत. देशाला मजबूत पंतप्रधान आणि गृहमंत्र्याची गरज आहे. कोणतंही संकट आल्यावर हे दोघे गायब होतात, असा जोरदार टोला ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत आहेत. ते आज राहुल गांधी यांची भेट घेतील.