Pune Traffic : सेंट्रल चौकाआधी, कोंडीच्या कल्पनेनेच थरकाप; वाहन पुढे सरकताना सत्त्वपरीक्षा, मोकळा चौक तर लॉटरीच
esakal August 12, 2025 03:45 AM

शिरगाव : जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड सेंट्रल चौक आणि कात्रज बायपास परिसर येथे रोजच वाहतूक कोंडी होते. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी हा चौक काही मीटर अंतरावर येताच कोंडीच्या नुसत्या कल्पनेने थरकाप उडतो.

कोंडीमुळे अनेक जणांची वादावादी, भांडणे होतात. त्यामुळे कोंडी आणखी वाढते. सकाळी आणि सायंकाळी गर्दी असताना वाद झाल्यास इतर जणांनाही याचा फटका बसतो. या चौकाच्या अलीकडे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. गाडी पुढे सरकण्यासाठी जणू काही सत्त्वपरीक्षाच पाहिली जाते. एखाद्या वेळी हा चौक चुकून मोकळा दिसलाच तर जणू काही लॉटरी लागल्यासारखे वाटते, अशी अनेकांची भावना आहे.

कोंडीवर उपाय म्हणून अलीकडे अनेक जण लोकलने जाण्यास प्राधान्य देत आहेत, मात्र या प्रश्नावर लवकर तोडगा नाही निघाला तर आणखी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल.

पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी द्रुतगती मार्ग आणि जुना राष्ट्रीय महामार्ग असे दोन पर्याय आहेत, पण त्याआधी मार्गावर ‘महा’कोंडी होते. याचा स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. याविषयी कारणमीमांसा करणारी मालिका.बी. आर. पाटील ः सकाळ वृत्तसेवा

प्रमुख कारणे
  • वाहनांच्या संख्येच्या तुलनेत

  • रस्ता अत्यंत अरुंद

  • चौकाची रचना व वाहनांचे

  • व्यवस्थापन अयोग्य

  • अनेक वाहनचालक कमालीचे बेशिस्त

  • सिग्नलवर कॅमेरे नसणे

  • सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय अपुरे

  • खासगी वाहनांच्या संख्येतील बेसुमार वाढ

  • आजूबाजूची जमीन संरक्षण खात्याच्या ताब्यात असल्याने उपायांवर मर्यादा

  • वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त

  • नेहमीच अपुरा

असे आहेत उपाय
  • एकूण वाहतूक व्यवस्थापन सुधारणा

  • दिवसातील वेळ आणि वाहनांच्या प्रमाणानुसार सिग्नलच्या वेळापत्रकात समन्वय गरजेचा

  • जड, अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याबाबत सखोल अभ्यास

  • आजूबाजूची जागा लष्कराची असल्याने त्या मर्यादेनुसार उपाय काढून तातडीने अंमलबजावणी

  • स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम कॅमेऱ्यांद्वारे रिअल-टाइम

  • वाहतूक नियंत्रण करणे

  • सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन

  • चालकांनी वाहतूक नियम पाळण्यावर

  • बारकाईने नजर

मला नोकरीसाठी रोज पिंपरीत जावे लागते. किमान तीन दिवस तरी मला कोंडीचा सामना करावा लागतो. परिणाम माझ्या वैयक्तिक कामावर याचा परिणाम होतो.

- नवनाथ सांगळे, शंकरवाडी

मला सोमाटणे येथील शाळेत जावे लागते. फक्त कोंडीच्या शक्यतेमुळे मला रोज किमान तासभर आधी निघावे लागते, तरच मी शाळेत वेळेवर पोहोचते. वाहतूक कोंडीच्या या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा.

- पुष्पा घोडके, शाहूनगर, चिंचवड

बेशिस्त वाहनचालकांवर

आम्ही कारवाई तर करतच आहोत, परंतु नागरिकांनीही जबाबदारी म्हणून वाहतूक नियम पाळले पाहिजेत. याशिवाय पुढे टोलच्या प्रशासनाने कामाचा वेग वाढवला तर कोंडी कमी होऊ शकेल.

- महेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, देहूरोड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.