भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे भोसरीत छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाच्या सर्व सोयींयुक्त अद्ययावत इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने २८ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या नवीन इमारतीनंतर परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची उत्तम सोय होणार आहे.
भोसरीत पिंपरी चिंचवड महापालिकेची दहावीपर्यंत शिक्षण देणारी छत्रपती श्री शिवाजी महाराज शाळा आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमाचीही शाळा येथे आहे. त्यामुळे भोसरी परिसरातील पालक आणि एमआयडीसीतील कामगारांचीही या शाळेला पसंती आहे. शिक्षणात नावारुपाला आलेली महापालिकेची ही शाळा आहे. मात्र, शाळेची सुमारे ५० वर्षे जुनी इमारत महापालिकेच्या सर्वेक्षणात धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शाळेची ही इमारत सध्या महापालिकेने पाडण्यास सुरुवात केली आहे. सध्या ही शाळा महापालिकेच्या भोसरी गावठाणात नव्याने बांधलेल्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली आहे.
शाळेसाठीच्या एकूण साडेसत्तर गुंठ्यात (६,५५३.३६ चौरस मीटर) शाळेसाठीच्या इमारतीचे येथे ५,५५७.४९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी वाहनतळासहित तळमजला, भूतल आणि तीन वरचे मजले असे एकूण ५ मजली शाळेचे बांधकाम होणार आहे. तीन मजल्याच्या बांधकामात एकूण ३९ खोल्या बांधण्यात येणार आहेत.
त्यामध्ये २७ वर्गखोल्या तर १२ खोल्या इतर सुविधेसाठी बांधण्यात येणार आहेत. याखेरीज, प्रतीक्षा कक्ष, परीक्षा विभाग, रेकॉर्ड रूम, डिस्पेन्सरी, लिफ्ट, जिने, मुला-मुली, महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शिक्षक कक्ष, संगणक कक्ष, प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी हॉल, प्रयोगशाळा व ग्रंथालय सुविधांचा समावेश असणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना खेळासाठीही मैदानही विकसित करण्यात येणार आहे.
भोसरीतील पीएमटी चौकात महापालिकेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शाळेच्या तीनमजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न महापालिकेचा असणार आहे.
- शैलेंद्र चव्हाण, उपअभियंता (स्थापत्य), ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय