Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण
esakal September 18, 2025 05:45 AM

नाशिक: नांदूर नाका परिसरात राहुल धोत्रे या युवकाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे याला मंगळवारी (ता. १६) न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला शनिवार (ता. २०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने निमसे सोमवारी (ता. १५) दुपारी शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकासमोर शरण आला होता.

गेल्या २२ ऑगस्टला निमसे याच्या गटाच्या संशयितांनी मोठ्या संख्येने जमाव करीत नांदूर नाका परिसरात राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर या दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. संशयितांनी राहुल धोत्रेवर धारदार हत्याराने वार करीत गंभीर जखमी केले होते. उपचारांदरम्यान २९ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संशयित उद्धव निमसे याच्यासह संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु निमसे तेव्हापासून फरारी झाला होता.

यादरम्यान धोत्रे याच्या नातलगांसह नागरिकांनी आंदोलन करीत निमसे याच्या अटकेची मागणी केली होती. आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली; परंतु संशयित निमसे पोलिसांच्या हाती लागत नव्हता; तर दुसरीकडे जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता, तेथेही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला.

त्यामुळे निमसे याने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकासमोर हजर होत शरणागती पत्करली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास निमसे याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आतापर्यंत १४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ॲड. सुनीता चिताळकर यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. सहायक आयुक्त शेखर देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Mathadi Workers Protest : कामगार संघटनांचा माथाडी कायद्यातील बदलांना विरोध, आंदोलन तीव्र

उत्तर भारतात पर्यटन

राहुल धोत्रे याचा रुग्णालयात मृत्यू झाल्यापासून संशयित निमसे फरारी झाला होता. यादरम्यान परराज्यांत होता. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये तो देवदर्शनाच्या नावाखाली फिरत होता. या कालावधीत त्याने स्वत:चा मोबाईल वापरला नाही. त्यामुळे त्याचा तांत्रिकदृष्ट्या माग काढणे पोलिसांना अडचणीचे गेले. तर, काही नजीकच्या नातलगांच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.