Explainer : तो 17 मिनिटांचा कॉल, अंकल या एका शब्दामुळे सरकार पडलं, थायलंडमध्ये काय घडलं?
Tv9 Marathi September 18, 2025 05:45 AM

Thailand Cambodia Border Conflict : गेल्या काही महिन्यांत थायलँडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. या देशात 5 सप्टेंबर रोजी नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात आली. आता थायलंडचा कारभार भूमजैथाई पक्षाचे अनुतिन चार्नविराकुल यांच्याकडे आला आहे. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. सध्या अनुतिन यांच्याकडे थायलंडच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आली असली तरी गेल्या काही दिवसांत या देशामध्ये बरंच काही घडलंय. एका 17 मिनिटांच्या कॉलने या देशातलं सरकार पडलं आहे. अंकल या एका शब्दामुळे पायंतोगर्टान शिनावात्रा यांना पंतप्रधानपदाची खूर्ची खाली करावी लागली होती. हा 17 मिनिटांचा कॉल नेमका काय होता? अंकल या एका शब्दामुळे नेमकं काय राजकारण रंगलं? हे जाणऊन घेऊ या…

शिनावात्रा पंतप्रधानपदापासून दूर होताच, राजकारणात खळबळ

पायंतोगर्टान शिनावात्रा यांना थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने निलंबित केलं होतं. कंबोडियाच्या सिनेटचे अध्यक्ष हुन सेन यांच्याशी सीमावादावर फोन कॉलद्वारे चर्चा करताना नैतिकतेच्या कायद्यांचे उल्लंघन केले आहे, असा ठपका यावेळी न्यायालयाने ठेवला होता. फोन कॉलमुळे जुलै 2025 मध्ये पाच दिवस हिंसक संघर्ष पाहायला मिळाला होता.

2023 च्या निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ

थायलंडमध्ये 2023 साली पिपल्स पार्टी या राजकीय पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र सेनेचे समर्थन असलेल्या लोकप्रतिनिधींनी पिपल्स पार्टीच्या उमेदवाराला पंतप्रधान होऊ दिले नाही. त्यानंतर फ्यू थाई पार्टीचे नेते स्रेठा थाविसीन पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र एका वर्षानंतर नैतिकेचे उल्लंघन केल्याचा ठकपा ठेवत त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर पायंतोगर्टान शिनावात्रा यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. मात्र कंबोडिया वादानंतर त्यांचे सरकार अल्पमतात आले आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आता इथे नवे सरकार स्थापन झाले असून अनुतिन चार्नविराकुल यांच्याकडे पंतप्रदानपद आले आहे.

अंकल म्हणणं का महागात पडलं?

थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांत सीमेवरून वाद आहे. हा वाद फार जुना आहे. याच वादावर तोडगा काढण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी पायंतोगर्टान शिनावात्रा यांनी कंबोडियाचे सिनेट अध्यक्ष तथा माजी पंतप्रदान हुन सेन यांच्याशी फोन कॉलद्वारे चर्चा केली. या फोनकॉलद्वारे शिनावात्रा यांनी हुन सेन यांचा अंकल असा उल्लेख केला. दोघांमध्ये एकूण 17 मिनिटांचा कॉल झाला. या फोन कॉलची रेकॉर्डिंग नंतर व्हायरल झाली होती. फोन कॉलमध्ये नेमकी काय-काय चर्चा झाली हे सार्वजनिक झाल्यामुळे थायलंडमधील लोकांच्या भावना तीव्र झाल्या. लोक संतापले. त्यांतर नैतिकतेचा भंग केल्याच्या आरोपाळी पायंतोगर्टान शिनावात्रा यांना दोषी ठरवण्यात आले. जुलै 2025 मध्ये थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने 7-2 अशा बहुमताने पायंतोगर्टान शिनावात्रा यांना दोषी ठरवले आणि त्यांना पंतप्रधानपदावरून हटवले. शिनावात्रा यांना फोन कॉलमध्ये हुन सेन यांना अंकल म्हणणे महागात पडले.

17 मिनिटांच्या कॉलमागे उद्देश काय होता?

शिनावात्रा यांना 17 मिनिटांच्या कॉलमुळे पंतप्रधानपद गमवावं लागलं. सीमावादाच्या मुद्द्यावर शिनवात्रा यांनी हुन सेन यांना कॉल केला होता. या कॉलमध्ये शिनावात्रा यांनी थायलंडची बाजू लावून धरावी अशी अपेक्षा होती. मात्र या फोन कॉलदरम्यान त्यांनी अत्यंत नमती भूमिका घेतली असा आरोप करण्यात आला. हा फोन कॉल नंतर सार्वजनिक झाला होता. या फोनकॉलमध्ये शिनावात्रा हुन सेन यांना अंकल म्हणताना ऐकायला ऐकू येत होते, असे सांगितले जाते. यामुळेच थायलंडच्या लोकांमध्ये संतापाची लाट आली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने पंतप्रधानपदावरून हटवले.

शिनावात्रा यांना मागावी लागली माफी

न्यायालयाने शिनावात्रा यांना पदावरून हटवल्यानंतर लगेच व्हायरल झालेल्या फोन कॉलबद्दल माफी मागितली. सध्या दोन्ही देशांत चालू असलेला संघर्ष थांबवण्याचाच माझा उद्देश होता. बाकी काहीही हेतू नव्हता, असे त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मात्र सत्तेतून खाली खेचल्यानंतर आता तिथे नवे सरकार आले आहे. शिनावात्रा या थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसीन शिनावात्रा यांची मुलगी आहे. त्या थाई रे थाई पार्टीच्या सदस्य आहेत. या पक्षाची 1998 साली स्थापना झाली होती. या पक्षाने आतापर्यंत पाच निवडणुका जिंकलेल्या आहेत.

कंबोडिया-थायलंड सीमावाद नेमका काय आहे?

कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशातील सीमावाद बराच जुना आहे. प्राचीन मंदिरे, या मंदिरांच्या आसपासच्या जमिनी यामुळे या दोन्ही देशांत वाद आहे. विशेषत: प्रीह विहियर आणइ ता मुएन थॉमच्या मंदिरांच्या मालकी हक्कांमुळे या दोन्ही देशांत वाद आहे. याच वादातून 24 जुलै 2025 रोजी या दोन्ही देशांच्या सीमेवर भीषण संघर्ष निर्माण झाला होता. गेल्या दशकभरातील हा सर्वात मोठा संघर्ष होता. हाच वाद सोडवण्यासाठी शिनवात्रा आणि हुन सेन यांच्यात फोन कॉल झाला होता आणि शिनावात्रा यांनी हुन सेन यांना अंकल म्हटल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

बहुमतासाठी 247 चा आकडा गाठणे गरजेचे असते

शिनावात्रा यांना पंतप्रधानपदापासून दूर व्हावे लागल्यानंतर थायलंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. तेथील तुमजैथाई पार्टीने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. या पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अनुतिन चार्नविराकुल यांचे नाव पुढे केले. त्यांना एकूण 146 खासदारांचे समर्थन लाभले. तसेच विरोधी बाकावरील पीपल्स पार्टीच्या 143 सदस्यांचेही समर्थन त्यांना लाभले. 492 खासदार असलेल्या त्यांच्या संसदेत बहुमतासाठी 247 चा आकडा गाठणे गरजेचे असते. हा आकडा त्यांनी गाठला आणि त्यांना या निवडणुकीत विजय झाला.

10 वेळा संविधान बदललं

थायलंड या देशात निवडणुका होतात. तिथे लोकप्रतिनिधी संसदेतही जातात. मात्र आतापर्यंत तब्बल 13 वेळा या देशातील सरकार पडलेले आहे. तर एकूण 20 वेळा या देशात संविधानबदल करण्यात आला आहे. 1923 सालापासून आतापर्यंत अनेकवेळा न्यायपालिकेचा प्रशासनात हस्तक्षेप पाहायला मिळालेला आहे. थायलंड देशात निवडणुका होतात म्हटल्यावर तिथे अन्य देशांप्रमाणेच कारभार चालत असावा, असे अनेकांना वाटते. मात्र तिथे सरकारी प्रशासन कार्यपालिका चालवते. मात्र इथे सेनेलाही महत्त्व आहे आणि इथे राजाही आहे.

सैन्याला आहेत बरेच अधिकार

थायलंडमध्ये 1992 सालापासून संवैधानिक राजेशाही राहिलेली आहे. म्हणजेच या देशाचे प्रमुख नरेश असतात. पण संविधानातील नियमानुसार तेथील सत्ता मात्र सरकारच्या हातात असते. सेनेला सत्ताबदल घडवून आणायचा असेल तर हा बदल नरेश यांच्या सहमतीशिवाय शक्य नसतो. याआधी 2014 साली सेनेने शेवटचे सत्ताबदल घडवून आणले होते. थायलंडमधील संविधान इतर देशांच्या तुलनेत कमकुवत आहे. त्यामुळे इथे सेनेद्वारे सत्ता बळकावण्याचा धोका कायम असतो. सध्या लागू असलेले या देशाचे 20 वे संविधान आहे. या संविधानाचा 2017 साली स्वीकार करण्यात आला होता. या संविधानाला एका सेनेचे समर्थन असणाऱ्या समितीने लष्कराच्या निगराणीखाली तयार केले होते. या संविधानात राजकीय पक्ष आणि राजकारण्यांना निष्प्रभ ठरवणारे अनेक कायदे आहेत. न्यायपालिकेला सोबत घेऊन लष्कर सरकारला अस्थिर आणि कमकुवत करू शकते. त्यामुळेच आतापर्यंत इथे अनेकवेळा सत्तांतर आणि संविधानबदल झालेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.