गडचिरोली : जिल्ह्यात माओवायांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करून सुरक्षा दलांना हानी पोचविण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. या प्रकारचे साहित्य माओवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवले जात असते. अशाच पुरून ठेवलेले माओवाद्यांचे जुने स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी अभियानादरम्यान जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार कोरची पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांकडून पोलिस पथकास घातपात करण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून स्फोटक पदार्थ व साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
सोमवार (ता. १५) पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्फोटकांचा शोध घेण्याकरिता योग्य योजना आखून लेकुरबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची तीन पथके व बीडीडीएसचे एक पथक माओवादविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले.
मंगळवार (ता. १६)जंगल परिसरात पायी शोध अभियान राबवीत असताना पोलिस पथकास लेकुरबोडी जंगल परिसरात एक संशयित ठिकाण आढळले. यावरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून या ठिकाणाची तपासणी केली असता, माओवाद्यांकडून लपवून ठेवलेला ५ लिटरचा १ नग स्टिलचा डब्बा, १.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धार लावलेले लोखंडी सिंलटर, ४ नग क्लेमोर व ८ नग इलेक्ट्रीक वायर बंडल मिळाले.
हातावरील टॅटूने हत्यारा जाळ्यातसुरक्षिततेची योग्य काळजी घेत पोलिस पथकाकडून घटनास्थळावर सर्व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसाद पवार, निखिल धोबे, बिडीडीएस गडचिरोलीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वलमर-पाटील सोबतच विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी पार पाडली.