Rahul Gandhi LIVE : राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब, निवडणूक आयोगावर तो मोठा आरोप काय?
Tv9 Marathi September 18, 2025 10:45 PM

Rahul Gandhi Hydrogen Bomb : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. भारतात मत चोरीचा त्यांनी आरोप केला. कर्नाटकमधीलच काही मतदारसंघाआधारे त्यांनी गंभीर आरोप केले. एक खास मॉडेल यासाठी वापरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मत चोरी ही कार्यकर्त्यांच्या हातून करण्यात आली नाही. तर त्यासाठी कॉल सेंटरचा वापर करण्यात  आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराला केंद्रीय निवडणूक आयोगाचे समर्थन दिसत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

अनेकांची नावं मतदार यादीतून गायब

त्यांनी यावेळी कर्नाटकातील काही मतदारसंघाचे पुन्हा उदाहरण दिले. त्यांनी यावेळी कर्नाटकातील काही मतदारांना पत्रकार परिषदेसाठी सुद्धा आमंत्रित केले. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. त्यांनी एका घरातील 12-12 नावं गायब झाल्याचा आरोप केला. त्यातील काहींनी पत्रकार परिषदेत मतदार यादीतून नावं कशी गायब झाली हे कळलंच नसल्याचे म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले.

राजुरा विधानसभा मतदार संघाचा उल्लेख

कर्नाटकातील विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील मतदान चोरीचा उल्लेख करतानाच राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघाचा ही उल्लेख केला. या ही मतदारसंघात अशीच गडबड झाल्याचा आरोप त्यांनी केला. हरियाणा आणि इतर राज्यातही मतदान चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. हा हायड्रोजन बॉम्ब नसला तरी ही मतदान चोरीची ही मोठी उदाहरणं आहेत असे ते म्हणाले.

ज्ञानेश कुमार मतदान चोरांना पाठिशी घालतायेत

यावेळी राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर मोठा गंभीर आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतदान चोरी करणाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. दलित, आदिवासी लोकांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप करत यामागे मोठे सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचा आणि त्यासाठी कॉल सेंटरचा वापर केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

CID ला अजून उत्तर नाही

मत चोरीत टार्गेट करून काँग्रेसचे मतदार डिलीट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी कर्नाटकमध्ये इतर व्यक्तींचे मोबाईल नंबर वापरण्यात आले. याविषयीची चौकशी कर्नाटकातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) केली. त्यांनी मतचोरीविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाशी वारंवार संपर्क केला. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नसल्याचा दावा खासदार राहुल गांधी यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.