आशिया कप 2025 स्पर्धेत 11 व्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. बी ग्रुपचा हा या साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान भिडणार आहेत. हा सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. अफगाणिस्तानने करो या मरो सामन्यात श्रीलंकेविरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतलाय. अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बी ग्रुपमधून हाँगकाँगचं आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे सुपर 4 साठी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस आहे. श्रीलंकेने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे श्रीलंका सुपर 4 मध्ये पोहचणार हे जवळपास निश्चित आहेत. मात्र अफगाणिस्तान विरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाल्यास श्रीलंकेचं नेट रनरेटच्या आधारावर पॅकअप होऊ शकतं.
बांगलादेशने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने जिंकलेत.बांगलादेशच्या खात्यात 4 गुण आहेत. मात्र बांगलादेशचा नेट रनरेट श्रीलंका आणि अफगाणिस्तानपेक्षा कमी आहे. त्यामुळे बांगलादेश सुपर 4 मध्ये स्वत:च्या जोरावर सुपर 4 मध्ये पोहचू शकली नाहीय. बांगलादेश सुपर 4 मध्ये पोहचणार की नाही? हे श्रीलंका-अफगाणिस्तान सामन्याच्या निकालावर ठरणार आहे. श्रीलंकेने हा सामना जिंकल्यास अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल आणि बांगलादेश अंतिम फेरीत पोहचेल. मात्र अफगाणिस्तानने सामना जिंकल्यास त्यांना सुपर 4चं तिकीट मिळेल. तसेच श्रीलंका पराभवानंतरही सुपर 4 मध्ये पोहचेल. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? यावर सुपर 4चं समीकरण अवलंबून आहे.
दरम्यान श्रीलंकेने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 तर अफगाणिस्तानने 2 बदल केले आहेत. श्रीलंकेने महीश तीक्षणा याच्या जागी दुनिथ वेललागे याचा समावेश केला आहे. तर अल्लाह गजनफर आणि गुलाबनदीन नईब यांच्या जागी मुजीब उर रहमान आणि परवेज रसुली यांचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिल मिश्रा, कुसल परेरा, चरिथ असालंका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा आणि नुवान तुषारा.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : सेदीकुल्लाह अटल, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, मोहम्मद नबी, दरविश रसूली, अजमातुल्ला ओमरझाई, करीम जनात, रशीद खान (कॅप्टन), मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.